Sat, May 25, 2019 22:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › समुद्रातील पंचतारांकित हॉटेल अखेर रखडले

समुद्रातील पंचतारांकित हॉटेल अखेर रखडले

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 1:58AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

अरबी समुद्रात तरंगते पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या एमटीडीसी आणि रश्मी डेव्हलपर्स यांच्या स्वप्नाला सुरुंग लागला. या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी मरिन ड्राईव्ह येथे तरंगती जेट्टी उभारण्यास उच्च न्यायालयाने आज नकार दिला.

यापूर्वी न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्च स्तरीय समितीने जेट्टी उभारण्यास परवानगी नाकारली असल्याने त्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एन.देशमुख यांच्या खंडपीठाने स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली. नरिमन पॉइंट येथील एनसीपीएजवळ फ्लोटिंग जेट्टी आणि राजभवनपासून दोन नॉटिकल माईल अंतरावर अरबी समुद्रात तरंगते पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या प्रकल्पाला एमटीडीसीने हिरवा कंदील दाखविला असताना या हॉटेलमध्ये जाण्या- येण्यासाठी लागणार्‍या जेट्टीस परवानगी नाकारण्याच्या महापालिका आणि त्रिसदस्य उच्चस्तरीय समितीच्या निर्णयाविरोधात रश्मी डेव्हलपर्सने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उभय पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने समुद्रात तरंगते हॉटेल उभारण्यास मुंबई पोलीस, तटरक्षक दल, वेस्टर्न नेव्हल कमांडने कधीच परवानगी दिलेली नाही़  वेस्टर्न नेव्हल कमांड यांच्याबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराचा  चुकीचा अर्थ  लावण्यात आला आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडने सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या मुद्यावर भर दिला आहे. त्यातच वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर पालिका आणि उच्चस्तरीय समितीचा परवानगी नाकारण्याचा निर्णय हा योग्यच आहे.  या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट करून याचिका फेटाळून लावली.

प्रस्तावित तरंगत्या पंचतारांकित हॉटेलला यापूर्वी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), वेस्टर्न नेव्हल कमांड,  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,  तटरक्षक दल आणि मुंबई पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले असल्याने जेट्टी बांधण्यास परवानगी द्यावी,  असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.