Sat, Jul 20, 2019 13:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्वात आधी सुरू  होणार ‘मेट्रो 7’

सर्वात आधी सुरू  होणार ‘मेट्रो 7’

Published On: Mar 25 2018 2:17AM | Last Updated: Mar 25 2018 1:56AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) प्रस्तावित असलेल्या सात मेट्रो प्रकल्पांपैकी दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व ही मेट्रो-7 मार्गिका सर्वात आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील कामांना सध्या वेग आला असून पिलर उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जवळपास एक वर्ष हाताशी असल्याने या कालावधीत ही कामे मार्गी लावली जातील. 

एमएमआरडीएचा नुकताच अर्थसंकल्प सादर झाला यामध्ये सातही मेट्रो मार्गिकांसाठी भरीव तब्बल 4700 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो-2 अ - दहिसर- चारकोप- वांद्रे- मानखुर्द (डी.एन.नगर (अंधेरी) ते दहिसर, मेट्रो-2 ब - डीएऩ नगर ते मंडाले, मेट्रो-3 - कुलाबा-वांद्रे-सिप्झ, मेट्रो-4 - वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली,  मेट्रो-5 - ठाणे-भिवंडी-कल्याण, मेट्रो-6 - कांजुरमार्ग समर्थनगर-जेव्हीएलआर-सिप्झ-कांजुरमार्ग- विक्रोळी, मेट्रो-7- अ - अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या सातही मार्गिकांचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. यातील मेट्रो-7 या मार्गिकेच्या कामाला आता गती आली असून स्थानकांची उभारणी, विद्युत प्रवाह व सिग्नल यंत्रणा ही महत्त्वाची कामे बाकी आहेत.  

मेट्रो-7 मार्गिकेनंतर दहिसर ते डी.एन.नगर हा मेट्रो-2 अ हा मार्ग पूर्ण होईल. अन्य पाच प्रकल्प पूर्ण होण्यास मात्र बराच अवधी आहे. मेट्रो-3 मार्ग पूर्ण करण्यासाठी 2019 सालचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु विविध कारणास्तव प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यास दीड वर्षाचा विलंब झाला. आता हा प्रकल्प सन 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु प्रत्यक्षात प्रकल्प 2022 साली कार्यान्वित होईल, अशी शक्यता आहे. मेट्रोच्या अन्य मार्गांपेक्षा हा मार्ग जास्त लांबीचा असल्याने बांधकामाचा आवाकाही मोठा आहे. 
मेट्रो 2-ब प्रकल्प बांधकामाच्या दृष्टीने अत्यंत क्लिष्ट मानला जातो. हा मार्ग तब्बल सहा ठिकाणी जोडला जाणार आहे. या मार्गिकेसाठी काही ठिकाणचे स्कायवॉक अंशतः तोडावे लागणार आहेत. 

तसेच उपनगरीय रेल्वेवरून हा मार्ग जात असल्याने रेल्वेची परवानगी, रात्रीच्या वेळेस गर्डर टाकण्याची करावी लागणारी कामे अशी अनेक प्रकारची आव्हानात्मक कामे आहेत. यामुळे हा मार्ग पूर्ण करताना कसोटी लागणार आहे.

मोनो-2 चे कमाल भाडे 40 रुपये

मुंबई : प्रतिनिधी

मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यानंतर मोनोचे किमान भाडे दहा तर कमाल भाडे चाळीस रुपये इतके असणार आहे. सध्या वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यावर फक्त दहा रुपये आकारले जात आहेत. अपघातानंतर बंद असलेल्या मोनोच्या पहिल्या टप्प्यावर अद्याप चाचण्याच सुरू आहेत. 

मोनोचा पहिला आणि दुसरा असा 24 किमीचा मार्ग सुरू झाल्यावर चार टप्प्यात प्रवासी भाडे आकारण्यात येणार आहे. कमाल भाडे चाळीस रुपये असले तरी कोणत्याही दोन टप्प्याच्या प्रवासासाठी दहा रुपये किमान भाडे असेल. मोनो गाड्यांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी 2018-19 या वर्षात गतवर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट खर्च अपेक्षित आहे. सध्या वडाळा ते चेंबूर या मार्गावर चालवण्यासाठी पाच गाड्या आहेत. दुसरा टपा सुरू झाल्यावर आणखी पाच गाड्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे या गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीमुळे खर्च वाढणार आहे. 

सध्या वडाळा ते चेंबूर मार्गावर मोनोची चाचणी सुरू असून ही चाचणी पूर्ण झाल्यावर सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावर इतर प्रक्रिया पूर्ण करून हा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रधिकरणाला महसूलही कमी मिळाला होता. महिन्याला किमान 80 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मोनोचा दुसरा टप्पा हा वर्दळीच्या भागांतून जात असल्याने प्रवासी आणि महसूल या दोन्हीमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

Tags : mumbai news, first, start, Metro 7,