Fri, Apr 26, 2019 15:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील पहिले जम्बो शौचालय अंधेरीत !

मुंबईतील पहिले जम्बो शौचालय अंधेरीत !

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:24AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

अंधेरी पश्‍चिम येथील गिल्बर्ट हिल येथे उभारण्यात आलेल्या, मुंबई शहरातील पहिल्या दुमजली जम्बो शौचालयाचे गुरूवारी लोकार्पण करण्यात आले आहे. 55 शौचकुपे असलेल्या या शौचालयामुळे गिल्बर्ट हिलकरांना दिलासाच नाही तर, येथील परिसर हागणदारीमुक्त होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

पालिकेने 2018 मध्ये मुंबईत 18 हजार 818 शौचकुपांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये अनेक एकमजली शौचालयांसह दुमजली व तीनमजली शौचालयांचे बांधकाम देखील करण्यात येणार असून याकरिता साधारणपणे 376 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. या शौचालयाचा शुभारंभ अंधेरी गिल्बर्ट हिल येथील प्रभाग क्रमांक 66 मध्ये करण्यात आला.

काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका मैहर मोहसिन हैदर यांच्या प्रयत्नातून झालेल्या या शौचालयाचे गुरूवारी काँग्रेसचे नेते गुरूदास कामत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मोहसिन हैदर, उपायुक्त किरण आचरेकर, विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या शौचालयात इंग्लिश व भारतीय शौचकुपे बसवण्यात आली असून अपंगांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  दरम्यान धोकादायक परिस्थितीत असणारी शौचालये तोडून त्याठिकाणी नवीन शौचालय उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या 11 हजार 170 शौचकुपांच्याच जागेत 15 हजार 774 शौचकुपांचे बांधकाम करण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांना जुन्या शौचालयांच्या जागेत अतिरिक्त 4 हजार 604 शौचकुपे उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त 3 हजार 44 शौचकुपे ही पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार आहेत. गेल्या सुमारे 20 वर्षांत बांधण्यात आलेली बहुतांश शौचालये ही एकमजली शौचालये आहेत. परंतु शौचालयाची गरज लक्षात घेऊन आता शक्य त्याठिकाणी दुमजली व तीनमजली शौचालये बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच यामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र मुतारी आणि लहान मुलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.