Tue, Nov 13, 2018 08:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आसनगाव होणार पहिले हरित स्थानक

आसनगाव होणार पहिले हरित स्थानक

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:40AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

आसनगाव स्थानकाचा विकास पहिले हरित स्थानक म्हणून करण्याचे नियोजन मध्य रेल्वेने पूर्ण केले आहे. 4 फेबु्रवारी रोजी या स्थानकाची घोषणा हरित स्थानक म्हणून केली जाणार आहे. या दिवसापासून स्थानकातील दिवे, पंखे आणि तिकीट मशीन्स पवन ऊर्जा तसेच सौर ऊर्जेवर चालणार आहेत.

सुमारे 75 हजार प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. या स्थानकात सध्या 11 किलो वॅट ऊर्जेचा वापर केला जातो. आसनगाव स्थानकात 10 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आणि 6 किलोवॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांत तयार होणारी वीज स्थानकात वापरली जाणार असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांनी सांगितले. 

या प्रकल्पामुळे स्थानकाच्या वीजबिलात मोठी बचत होणार आहे. त्यामुळे साहजिकच कार्बनचे उत्सर्जनही कमी होणार आहे. अतिरिक्‍त ऊर्जा लोकल ग्रिडसाठी वापरली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. आसनगाव स्थानकाव्यतिरिक्‍त इतर 50 स्थानकांत एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या वीजबिलात 1.48 कोटी रुपयांची बचत प्रतिवर्षी होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.