Sun, Mar 24, 2019 08:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील पहिला गे स्वयंवर रिअ‍ॅलिटी शो

देशातील पहिला गे स्वयंवर रिअ‍ॅलिटी शो

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी

भारतीय टीव्ही रिअ‍ॅलिटी शोच्या इतिहासात लवकरच अनोखा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वातील स्पर्धक आणि फॅशन डिझाईनर सब्यसाची सत्पथीचे स्वयंवर आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा समलैंगिक स्वयंवर असेल.

सुप्रीम कोर्टाने काहीच दिवसांपूर्वी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक शारीरिक संबंध हा गुन्हा नसेल. होमोसेक्शुअ‍ॅलिटी गुन्हा नसल्यामुळे सब्यसाचीचा जाहीरपणे स्वयंवर रचण्याची तयारी सुरू आहे. सब्य का स्वयंवर असे या रिअ‍ॅलिटी शोचे नाव असणार आहे.

आतापर्यंत अभिनेत्री राखी सावंत (राखी का स्वयंवर), प्रमोद महाजन यांचे पुत्र राहुल महाजन (राहुल दुल्हनिया ले जाएंगे) आणि अभिनेत्री रतन राजपूत (रतन का रिश्ता) यांचे स्वयंवर मनोरंजन वाहिन्यांवर आयोजित झाले होते. मात्र टीव्हीवर गे स्वयंवर रचण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

सब्यसाचीने सलमान खानच्या बिग बॉस 11 या गाजलेल्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. सब्यसाचीने आपल्या लैंगिक कलाविषयी (सेक्शुअ‍ॅलिटी) यापूर्वीही खुलेआमपणे सांगितले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्याच्या आत्मविश्वासाला बळकटी आली आहे. राखी सावंत किंवा राहुल महाजन यांच्या स्वयंवराप्रमाणेच सब्यसाचीच्या स्वयंवराचा फॉर्मेट असेल. फक्त सब्यसाची गे पार्टनरचा शोध घेईल, इतकाच फरक असेल.

समलैंगिक संबंधांना कोर्टाची मान्यता मिळाली असली, तरी समाजात त्याविषयी मोकळेपणा नाही. तसेच भारतात अद्याप समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे या कार्यक्रमात किती जण सहभागी होतील, आपल्या सेक्शुअ‍ॅलिटीबाबत जाहीर कार्यक्रमात कोण वाच्यता करेल, याबाबत निर्माते विचार करत आहेत.