Fri, Aug 23, 2019 21:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात येतोय पहिला पीआरटीएस प्रकल्प!

ठाण्यात येतोय पहिला पीआरटीएस प्रकल्प!

Published On: Feb 19 2018 1:59AM | Last Updated: Feb 19 2018 1:59AMठाणे : प्रतिनिधी

सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करणार्‍या तसेच मेट्रो प्रकल्पाला पूरक ठरणारी वैयक्तिक जलद वाहतूक यंत्रणा अर्थात पीआरटीएस (पर्सनल रॅपिड ट्रँजिस्ट सिस्टीम) प्रकल्प राबविण्याबाबतची अनुकूलता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दर्शविली आहे.

ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या आढावा बैठकीत पीआरटीएस प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी आयुक्त जयस्वाल यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतची शक्यता वर्तविली. अंतर्गत मेट्रोबरोबरच पीआरटीएसची मार्गिकाही अंतिम करण्याबाबत चर्चा होऊन पुढील आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रोचे सल्लागार आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मेट्रो आणि पीआरटीएस मार्गिका अंतिम करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी अधिकार्‍यांना दिल्या असून पुढील आठवड्यात यावर अंतिम निर्णय देखील घेण्यात येणार आहे.