Sat, Apr 20, 2019 18:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत आग : १६ गोदामे खाक

भिवंडीत आग : १६ गोदामे खाक

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:15AM

बुकमार्क करा


भिवंडी : वार्ताहर 

भिवंडी-ठाणे बायपास रस्त्यावरील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील सागर कॉम्प्लेक्स येथील गोदामांना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधे, प्लास्टिक व इतर साहित्य साठवलेला असल्याने ही आग सर्वत्र पसरत एकूण 16 गोदामे यात जाळून खाक झाली. भिवंडीसह कल्याण, ठाणे, उल्हासनगर येथील अग्निशामक दल आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असून, आग विझवण्यासाठी 48 तास लागणार असल्याची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात आली. 

ओवळी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या संख्येने गोदामे असून येथील सागर कॉम्प्लेक्समधील चेक पॉईंट या गोदामास ही आग लागली. पाहता पाहता ही आग पसरत गेली. या संपूर्ण गोदामांमध्ये आतून जाण्यासाठी शटर असल्याने चेक पॉईंट गोदामात लागलेली आग सर्वत्र पसरत गेली. त्यामध्ये अकरा गोदामे जळत असतानाच भिवंडी, कल्याण, ठाणे महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न अपुरे पडत असतानाच ही आग नजीकच्या इंटरव्हेट इंडिया या कंपनीच्या औषधे साठविलेल्या पाच गोदामात पसरली.

त्यातच अग्निशामक दलाच्या वाहनांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. शिवाय पाण्याचा अपुरा साठा यामुळेही आग विझवताना अडथळा निर्माण होत होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव हे पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी हजर होते. ही आग विझवण्यासाठी तब्बल 48 तासाहून अधिक वेळ लागेल, अशी माहिती अग्निशामक अधिकारी डी. एन. साळवे यांनी दिली.

आगीचे कारण अजून स्पष्ट नसून यात सोळा गोदामांमधून साठवलेला कोट्यवधी रुपयांचा माल जाळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची महिती देण्यात आली.