Sun, May 26, 2019 09:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विनोद कांबळी आणि पत्नीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा!

विनोद कांबळी आणि पत्नीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा!

Published On: Jul 02 2018 11:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:59AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विनोद आणि त्याची पत्नी एड्रिया या दोघांच्या विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायिका अंकिता तिवारीचे वडील राजेंद्र कुमार तिवारी यांनी या दोघांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तिवारी यांनी विनोद आणि एड्रिया यांच्याविरोधात बांगुर नगर पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 504 (शांतता भंग करणे आणि जाणिवपूर्वक अपमान करणे), कलम 323 (मारहाण करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना इनऑब्रिट मॉलमध्ये घडली. तिवारी यांच्या दाव्यानुसार मॉलमध्ये या दोघांनी त्यांना मारहाण केली. एड्रिया यांना माझा चुकीने हात लागला. यावर संतप्त झालेल्या विनोद कांबळी यांनी मारहाण केली. 

या घटनेवर बोलताना विनोदने सांगितले की, तिवारी यांनी माझ्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने हात लावला. दुपारी 3च्या सुमारास आम्ही मॉलमधील गेम्स झोनमध्ये असताना ही घटना घडली. या व्यक्तीने एड्रियाला चुकीच्या पद्धतीने हात लावला. यावर एड्रियाने प्रतिकार केला. तेव्हा तो तेथून निघून गेला. पुन्हा काही मिनिटांनी फुड कॉर्नर येथे तिवारी आणि दोन जण आले आणि त्यांनी एड्रियाला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे विनोदने सांगितले. या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे आणि त्याचा मी फॉलोअप घेणार असल्याचे तो म्हणाला. 

वाद आणि विनोद कांबळी 

याआधी ही अनेक वेळा विनोद कांबळी वादात सापडले आहेत. 2015मध्ये विनोद आणि एड्रिया यांच्या विरोधात त्यांच्या घरात काम करणाऱ्या सोनी नफायासिंह सरसाल हिने मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. पगार मागितला म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सोनीने या दोघांवर केला होता.