Thu, Jul 18, 2019 12:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे पोलिसांना फेरीवाल्यांनी केली मारहाण

रेल्वे पोलिसांना फेरीवाल्यांनी केली मारहाण

Published On: Feb 22 2018 7:21PM | Last Updated: Feb 22 2018 7:21PMकल्याण : वार्ताहर  

कल्याण पूर्व कोलशेवाडी येथील रेल्वे परिसरात रेल्वे सुरक्षा दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांच्याकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. येथील रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी शैलेश पाटील व महिला कर्मचारी कल्पना पाठक हे गस्त घालत असताना एका फेरीवाला भाजी विक्रेता त्यांना आढळून आला, त्याला कारवाईसाठी कार्यालयात नेत असताना या फेरीवाल्याने त्याच्या साथीदारांसह दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, ठोशा बुक्क्यांनी मारहाण करत तेथून पळ काढला. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिस स्थानकात भाजी विक्रेता प्रशांत गांगुर्डेसह त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एलफिस्टन दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीत बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र या कारवाईस फेरीवाल्यांचा विरोध कायम असून अनेकदा वाद निर्माण होत आहेत. 

काल (बुधवार) रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे सुरक्षा दलात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी शैलेश पाटील व महिला कर्मचारी कल्पना पाठक हे कोलशेवाडी येथील गणेश मंदिर रेल्वे परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी त्यांना प्रशांत गांगुर्डे हा फेरीवाला या ठिकाणी भाजी विक्री करत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी प्रशांत गांगुर्डे याला कारवाईसाठी कार्यलयात येण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या प्रशांत गांगुर्डे व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी पोलीस कर्मचारी शैलेश पाटील याच्यासह महिला कर्मचारी कल्पना पाठक यांना शिवीगाळ करत ठोशा बुक्क्यांनी मारहाण केली. 

या मारहाणीत पाटील व पाठक हे दोघेही गंभीर जखमी झाले असून पाटील यांची चैन, अंगठी व मोबाईल ही गहाळ झाला आहे. या प्रकरणी पाटील यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रशांत गांगुर्डे व त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरु केला आहे.