होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक लाख शेतकर्‍यांचा लाँग मार्च

एक लाख शेतकर्‍यांचा लाँग मार्च

Published On: Mar 10 2018 2:16AM | Last Updated: Mar 10 2018 1:59AMठाणे : प्रतिनिधी  

सरकारने कर्जमाफी केल्यानंतरही राज्यात तब्बल 1753 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती संकटात आहे, शेतकरी हतबल झाला आहे. अशा काळात शेतकर्‍याच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी सरकार फक्त फसव्या घोषणा करत आहेत. सरकारच्या या फसवणूकीच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घेतला आहे. त्यासाठी 6 मार्चपासून नाशिक जिल्ह्यातून निघालेला शेतकर्‍यांचा लाँग मार्च 12 मार्च रोजी मुंबईत विधान भवन येथे पोहोचणार आहे.

मोर्चात सहभागी होणारे सुमारे 1 लाख शेतकरी विधानभवनाला घेराव घालणार असून मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नाहीत. अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे  इंद्रजीत गावित आणि विजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. कसत असलेल्या वन जमिनी करणार्‍यांच्या नावे करा, वनजमिनीचा कायदा 2006 साली झाला, 2008 ला नियम तयार केले, परंतु कायद्यानुसार त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे हजारो वनजमीन धारकांना वनखात्याकडून त्रास होतो आहे. या त्रासामुळे शेतकर्‍याच्या शेती करण्यात असंख्य अडचणी येत आहेत, याकडे डॉ. ढवळे यांनी 
लक्ष वेधले. 

नदी जोड प्रकल्पांचा लाभ स्थानिक शेतकर्‍याना द्या, त्यांच्यासाठी पाणी राखीव ठेवा, महाराष्ट्राचे पाणी कोणत्याही अटीवर गुजरातला देवू नका, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. 
याखेरीज संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचा गरजू व पात्र व्यक्तींना तात्काळ लाभ द्यावा, ंया योजनेच्या रकमेत वाढ करा, शेतकर्‍यांचे वीजबील माफ करा, शेतमालाला दीडपट हमी भाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, अशा मागण्या यावेळी  गावित आणि पाटील यांनी केल्या.