Mon, Apr 22, 2019 03:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकर्‍याने गळफासासाठी शेतात बांधला दोरखंड

शेतकर्‍याने गळफासासाठी शेतात बांधला दोरखंड

Published On: Aug 03 2018 7:48AM | Last Updated: Aug 03 2018 7:48AMशहापूर : वार्ताहर

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनातील शहापूर तालुक्यातील दळखन गावातील गट नं. 220 अ, ब या जमीन क्षेत्राच्या भूसंपादनाच्या मोबदल्यापासून लक्ष्मण म्हसकर या शेतकर्‍याला अधिकार्‍यांनी वंचित ठेवले. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या सदर शेतकर्‍याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफासाचा दोरखंड बांधून ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

समृद्धी बाबतच्या न्यायीक प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत म्हसकर यांनी यापूर्वीच येत्या 15 ऑगस्ट रोजी शहापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

 दळखन गावातील गट नं. 20 अ, ब हे जमीनक्षेत्र समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित होत आहे. त्यापैकी 74 गुंठे जमीन क्षेत्रात म्हसकर यांची  ताबा व वहिवाट सुरू असून हे जमीनक्षेत्र सदर शेतकरी नागळी, वरई, उडीद, खुरासणी उडीदाचे पीक घेण्यासाठी सलग तीन पिढ्यांपासून कसत आहे. याबाबतची महसूली नोंद घेण्यासाठी खर्डीतील तलाठी यांना वेळोवेळी अर्ज देण्यात आले असूनही संपादित जमीनक्षेत्राच्या मोबदल्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप या शेतकर्‍याकडून करण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास शेती करून राबत असलेल्या शेतातच आत्महत्या करण्यासाठी या शेतकर्‍याने थेट शेतातील आंब्याच्या झाडाला गळफासाचा दोरखंड बांधून ठेवला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसण्याचा इशारा देखील या शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दिला आहे.