होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्‍लॉग : दोन 'इंद्रां'च्या राज्यात जनता संपावर

ब्‍लॉग : 'अबकी बार, सेलिब्रिटींसे प्यार..!'

Published On: Jun 08 2018 3:47PM | Last Updated: Jun 08 2018 4:27PMशंकर पवार, पुढारी ऑनलाईन

रोम जळत होतं तेव्‍हा निरो फिडेल वाजवत होता, हे प्रतीक महाराष्‍ट्रात सध्याच्या काळात तंतोतंत जुळतंय. परंतु, त्यानंतर निरोला सत्ता गमवावी लागली, अशीच स्‍थिती महाराष्‍ट्रात होणार की काय? राज्यात शेतकरी, बँक कर्मचारी, एसटी कर्मचारी, उच्‍च शिक्षित तरुणांची आंदोलनं सुरू आहेत. तर सरकारमधील नेतेमंडळी मात्र सेलिब्रिटींच्या भेटीत दंग आहेत. मुळात राजा किंवा सत्ताधारी हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असतात. पण, सध्याचे महाराष्‍ट्रातील चित्र पाहिले तर सत्ताधारी आपल्या भविष्याचा प्रश्न सोडविण्यात तल्‍लीन आहेत. तर प्रजा मात्र आश्वासनरूपी दान खरंच मिळेल या आशेवर पुन्‍हा रस्‍त्यावर उतरली आहे. 

सत्तेत आल्यापासून केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकारने अक्षरश: आश्वासनांचा पाऊस पाडला. त्यांनी सुरुवातीच्या काळातील सभा गाजवल्याही. परंतु, पुढे आश्वासने सत्यात उतरण्यासाठी द्यायची नसतात, हा राजकारण्यांचा अलिखित नियम स्‍वत:ला वेगळे म्‍हणवणार्‍या भाजप नेत्यांनीही  पाळला. त्यामुळेच एकाच मागणीसाठी आंदोलन, आश्वासनांवर माघार आणि पुन्‍हा आंदोलन हे 'नाट्य' राज्यात सुरू आहे. केंद्र आणि राज्यातील निर्ढावलेले मंत्री जबाबदारी घेण्याऐवजी बेजबाबदार बरळत सुटले आहेत. तर सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष सेलिब्रिटींच्या भेटीसाठी मुंबापुरी भोवती गिरक्या घेत आहेत. तसंही महाराष्‍ट्रभर विविध मागण्यांसाठी आंदोलनं सुरू असताना त्यांना मायानगरी मुंबापुरीच सुरक्षित वाटत असावी.

शेतकर्‍यांचं रडगाणं नेहमीचच, शेतकरी अट्टल स्‍टंटबाज एवढं चांगलं शेतकर्‍यांबद्दल मत असणारे महाशय देशाचे कृषिमंत्री आहेत. यावरून शेतकरी उगाचच संप करत सुटला आहे, असेच मत सत्ताधार्‍यांचे असल्याचे दिसते. शेतकर्‍यांना वेळ देण्यापेक्षा रतन टाटा, माधुरी दीक्षित, सलीम खान ही नावं कशी मोठी आणि फायद्याची आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणं हे २०१९ च्या दृष्‍टीनं महत्त्‍वाचं आहे. शेतकरी आश्वासनांवर शांत राहत नाहीत. त्यात सत्ताधार्‍यांचा तसा दोषच नाही. कारण त्यांचं काम त्यांनी इमानेतबारे केलं आहे. कारण त्यांनी पहिल्या आंदोलनाच्या वेळीच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं होतं. तरीही शेतकरी पिकाला हमीभाव, दुधाला दर, कर्जमाफी अशा त्याच त्या मागण्या मागत दहा दिवस संपावर गेले हे सरकारच्या दृष्‍टीनं चुकीचंच आहे. त्यामुळेच त्यांची दखल घेणं सरकारला महत्त्‍वाचं वाटत नाही, असे दिसते.

Image may contain: 3 people, people smiling, people standing and crowd

दुसरीकडे राज्यात आणि केंद्रात गळ्यात गळे घालून सत्तेची ऊब घेणार्‍या मित्रांना आगामी २०१९ ची चिंता आहे. त्यामुळे राज्यातले उच्‍चशिक्षित तरुण पाच-पाच दिवस उपाशी असले तर काय फरक पडणार. तसंही लोकांचं कल्याण शिक्षणानं होतं, आम्‍ही शिक्षणासाठी अमूक करू, असं सभेत ठोकून दिलं की संपलं. त्यासाठी शिक्षकांची गरज मुळी पडतेच कुठे. कारण राज्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांपासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत शिक्षक कमी असले तरी शाळांचं काम खोळंबलं नाहीच की. परंतु, जर युती झाली नाही तर निवडणुकीचं काम मात्र आडू शकतं. त्यामुळे भेटी-गाठीचे कार्यक्रम हे उपोषण करणार्‍या डॉक्‍टरेट मिळवलेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यापेक्षा महत्त्‍वाचंच आहे. 

कित्येकदा आपल्या मागण्या एसटी कर्मचार्‍यांनी रेटूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी संपावर जाऊन प्रवाशांचे हाल झाले, तरीही सरकारने त्याची लवकर दखल घेतली नाही. आता पुन्‍हा त्याच मागण्यांसाठी अचानक एसटी कर्मचारी संपावर गेले. पुन्‍हा सामान्य जनांचे हाल सुरू झाले. त्याचीही दखल घेण्याची गरज सरकारला वाटत नाही. कारण सरकार देशात बुलेट ट्रेन आणणार आहे. 'एक्‍सप्रेस वे'चे कामही जोरात सुरू आहे. त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनींचे अधिग्रहणही सुरू आहे. परंतु, शेतकरी मात्र नेहमीच विरोध करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळेच राष्‍ट्रीय अध्यक्षांना सेलिब्रिटी आणि जुन्या मित्रांना भेटण्यासाठी वेळ हवा आहे. 

Image may contain: 3 people, people standing

काहीही असो परंतु सध्या देशात आणि राज्यात शेतकरी, एसटी कर्मचारी, बँक कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, उच्‍च शिक्षित तरुण, शिक्षक भरती असे कोणतेही प्रश्न महत्त्‍वाचे नसून महत्त्‍वाचा प्रश्न २०१९ ची निवडणूक जिंकणं आणि जुन्या मित्रांना मनवणं हाच आहे. त्याशिवाय कोणताही प्रश्न सध्यातरी शिल्‍लक नाही. तसंही दोन इंद्रांचं नेतृत्‍व असताना सर्व काही अलबेलच असलं पाहिजे. 
Image may contain: 1 person, smiling, standing and outdoor

Tags : blog, BJP, maharashtra, farmers strike, professor, ST workers strike, amit shah, celebrities, madhuri dixit, shivsena, uddhav thackeray