होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शॉक लागून वाड्यातील  प्रसिद्ध मूर्तिकाराचा मृत्यू

शॉक लागून वाड्यातील प्रसिद्ध मूर्तिकाराचा मृत्यू

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:12AMवाडा : वार्ताहर

27 वर्षांपासून गणपतीच्या सुंदर मूर्ती बनवून वाड्यातील ग्रामीण भागातील गणेश भक्तांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण करणार्‍या प्रसिद्ध मूर्तिकार वासुदेव ठाकरे (49) यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ठाकरे हे मूळचे वाडा  तालुक्यातीलच सारशी गावातील रहिवासी असून अनेक वर्षांपासून ते पाली या ठिकाणी आपल्या स्नेहल कलाकेंद्र या कारखान्यात राहत होते.

बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास ठाकरे यांच्याकडे मूर्ती पाहण्यासाठी काही ग्राहक आले होते. त्यावेळी उजेडासाठी लावलेला हॅलोजन अचानक बंद झाला. तो दुरुस्त करण्यासाठी ठाकरे उठले व त्यात त्यांच्या हाताला विद्युत वाहक तारेचा स्पर्श होऊन त्यांना विजेचा जबर धक्का बसला. याचवेळी त्यांच्या डॉक्टर असलेल्या मुलीने विद्युत प्रवाह खंडित केला व शेजारी असलेल्या डॉक्टरांकडे त्यांना घेऊन गेली. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाडा येथे नेण्यात आले. मात्र वाटेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वासुदेव ठाकरे व त्यांच्या पत्नीने मोठ्या मेहनतीने आपला हा व्यवसाय उंचीवर नेला होता. आज ठाकरे हे जवळपास 1200 ते 1600 गणेश मूर्ती तयार करीत असत.अगदी वर्षभर हे काम सुरूच असे. स्वतः उत्तम चित्रकार असल्याने त्यांनी तयार केलेल्या मूर्तीत ते जीव ओतून काम करायचे. मोठ्या मेहनतीने त्यांनी एका मुलीला डॉक्टर तर दुसर्‍या मुलीला चित्रकार बनवले. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबासह वाडा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.