Wed, Jul 24, 2019 08:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवाजी पार्क परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शिवाजी पार्क परिसरात एकाच कुटुंबातील तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jan 26 2018 6:21PM | Last Updated: Jan 28 2018 1:23AMमुंबई : प्रतिनिधी

शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न शिवाजी पार्क पोलिसांनी उधळून लावला. समजूत काढून त्यांना त्यांच्या परभणी येथील गावी पोलिसांनी पाठवले. अखिलाबेगम समशेर खान, तिचा मुलगा मन्सूरखान समशेर खान आणि दिर यासिन खान शमीर खान यांचा यात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांत काहीजण आत्मदहनाच्या प्रयत्नात असल्याची माहिती शिवाजीपार्क पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी सकाळपासून शिवाजी पार्क पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून संशयित फिरणार्‍या अखिलाबेगम खान, तिचा मुलगा मन्सूरखान आणि दिर यासिन खान या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत अखिलाबेगम ही परभणीच्या मदिनानगरची रहिवासी असल्याचे समजले.  तिचा पती समशेर खान याला 25 डिसेंबर 2016 रोजी नानलपेठ पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. अटकेनंतर त्याला तेथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, पोलीस कोठडीत असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती नंतर अखिलाबेगम खानला समजली होती. 

पोलीस कोठडीतील या मृत्यूची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले  होते. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलीस निरीक्षक एम. एस. रौफ यांना अटक केली होती. मात्र, गुन्हा नोंद होताच दोन्ही पोलीस कर्मचारी पळून गेले होते. या दोघांनाही या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या घटनेला जबाबदार पोलिसांवर कारवाई व्हावी, त्यांचे आर्थिक पुनवर्सन व्हावे तसेच शासकीय मदत मिळावी यासाठी अखिलाबेगम खान ही प्रयत्नशील होती. मात्र, राज्य शासनाकडे वारवांर दाद मागूनही त्यांची मागणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे अखिलाबेगम ही तिचा मुलगा मन्सूरखान आणि दिर यासिनखानसोबत शुक्रवारी मुंबईत आली होती. शिवाजी पार्क येथे सुरु असलेल्या प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमांत त्यांचा आत्मदहनाची योजना होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनंतर शिवाजी पार्क पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून तिथे आलेल्या अखिलाबेगमसह तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना एक रॉकेलची बाटली आणि एक चाकू सापडला.