Fri, Apr 26, 2019 17:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महागड्या कार, दुचाकीसह सायकली आगीत जळून खाक

महागड्या कार, दुचाकीसह सायकली आगीत जळून खाक

Published On: May 25 2018 1:22AM | Last Updated: May 25 2018 12:44AMधारावी : प्रतिनिधी 

एका दुचाकीसह दोन महागड्या कार व तीन सायकली जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना धारावी कुर्ला लूप रोडवरील धारावी बस डेपो समोरील राजीव गांधी नगर येथे गुरुवारी पहाटे घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहन पार्क करणार्‍या रहिवाशांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे रहिवाशांनी आपली वाहने राजीव गांधी नगरला लागून असलेल्या रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. पहाटे या वाहनांना अचानक आग लागल्यानंतर रहिवाशांनी घटनेची माहिती धारावी पोलिसांना दिली. 

धारावी पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील कुर्ल्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली. काही क्षणातच घटनास्थळी दाखल झालेल्या शाहूनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. धारावी पोलीस,  अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी आगीचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील वायरींगचे शॉर्टसर्किट झाल्यानंतर त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर होऊन आग भडकली असावी, असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.