Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मार्चअखेरीस?

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मार्चअखेरीस?

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:16AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे अनेकांना वेध लागले असले तरी एवढ्यात विस्तार होण्याची शक्यता नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच विस्ताराला मुहूर्त लागू शकतो, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. येत्या आठवडाभरात हा रखडलेला विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र, ही चर्चाही फोल ठरण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्तार करून खांदेपालट आणि नव्या दमाच्या चेहर्‍यांचा समावेश करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या मनात असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याने दिली. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर शिवसेनेची भूमिका काय राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकार धोक्यात आणण्यापेक्षा विस्तार लांबणीवर टाकण्यावर भाजपचा भर आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र पक्ष स्थापन केला. भाजपने त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्‍वासन दिले आहे. राणेंना काँग्रेस सोडता क्षणीच मंत्रिमंडळात स्थान हवे होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी असलेली अदृश्य साथ आता सोडली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी भाजपला शिवसेनेला दुखावणे परवडणारे नाही. 

नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेचा विरोध आहे. राणेंना मंत्रिमंडळात घेतल्यास शिवसेना काय पवित्रा घेईल, हे सांगता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी विस्ताराचा निर्णय लांबणीवर टाकल्याचे समजते. 26 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन किमान पाच आठवड्यांचे असेल. त्यामुळे मार्चनंतरच मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो.