Thu, Jun 27, 2019 10:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एफेड्रिन विक्रीतील मुख्य आरोपी फैयाजला बंगलोरमधून अटक

एफेड्रिन विक्रीतील मुख्य आरोपी फैयाजला बंगलोरमधून अटक

Published On: Jan 26 2018 1:35AM | Last Updated: Jan 26 2018 1:08AMविरार : वार्ताहर

एफे ड्रिन अमली पदार्थ विक्रीतील मुख्य आरोपी फैयाज शेख याला बंगलोर येथून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या नालासोपारा पथकाला यश मिळाले. ते सलग 27 दिवस बंगलोरमध्ये ठाण मांडून बसले होते. 27 व्या दिवशी फैयाजला सिग्नलवर अटक करण्यात आली.

एफे ड्रिन या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी वसईत आलेल्या तिघांना 21 लाख 70 हजार रुपये किमतीचे 21.700 किलो एफे ड्रिनसह 24 सप्टेंबर 2017 रोजी अटक करण्यात आली. त्यावेळी याचा प्रमुख सूत्रधार फैय्याज शेख आणि त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले होते. 12 ऑक्टोबर 2017 ला फैयाजचा भाऊ रियाज याला अटक करण्यात आली, मात्र फैयाज हाती लागला नाही. फैयाज व त्याचे नातेवाईक मोबाईलवरून नेट कॉलचा वापर करत असल्याने त्याचा ठावठिकाणा काढण्यात पोलिसांना अपयश येत होते. डिसेंबर 2017 मध्ये फैयाज हैद्राबाद येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे नालासोपार्‍याचे पोलीस नाईक सचिन दरेकर यांना मिळाली. 

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे  एक पथक तयार करून  हैद्राबाद येथे गेले, मात्र हे पथक पोहोचण्याच्या 10 मिनिटे आधी फैयाज तेथून निघून गेला होता. तो ज्या हॉटेलात उतरला, त्या हॉटेल मॅनेजरने त्याला पोलीस येत असल्याची माहिती दिली होती. हे पथक तेथे फैयाजचा शोध घेत असतानाच पोलिसांना फैयाज बंगलोरला गेल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी बंगलोर गाठले.

बंगलोरमध्ये राहणार्‍या फैयाजच्या नातेवाईकांची माहिती घेतली असता जयनगरमध्ये त्याच्या पत्नीची बहिण राहते व तो तेथेच असू शकतो, असे कळले. यानंतर पथकाने वेषांतर करून त्या परिसरावर लक्ष ठेवले आणि एक दिवशी तेथे साजिद दिसून आला. साजिद दिसताच फैयाज येथेच असल्याचा या पथकाचा संशय पक्का झाला. सरळ समोर गेल्यास साजिद ओळखेल आणि फैयाज पुन्हा हातातून निसटेल हे लक्षात घेऊन पोलिसांनी तेथील स्थानिक माहितीगार तयार केले. त्यांना फैयाजचा फोटो दाखवला आणि तो जयनगरमध्ये आहे का याची माहिती काढण्यास सांगितले. तो तेथेच असल्याचे माहितीगाराने सांगताच पोलीस पथकाने आपला सापळा घट्ट करण्यास सुरुवात केली. दोघे जण गाडीत बसले, दोघे जण रिक्षात आणि दोघे जण मोटारसायकलवर वेगवेगळ्या ठिकाणी बसून राहिले आणि एक दिवशी जय नगरमधून सँट्रो कार बाहेर पडली. त्यावेळी एका कारमध्ये बसलेले पोलीस सचिन दरेकर यांचे लक्ष तेथे गेले तेव्हा सँट्रो कारमध्ये साजिद आणि एक व्यक्ती असल्याचे दिसले. साजिद बरोबर फैयाजच आहे याची खात्री पटताच पोलिसांनी त्यांचा  पाठलाग सुरू केला. सुमारे 7 ते 8 कि.मी हा पाठलाग सुरू होता. 

त्यात दोन सिग्नल मिळाले, पण त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांना  शक्य झाले नाही. मात्र, तिसर्‍या सिग्नलला पोलिसांनी सँट्रो कारच्या पाठोपाठच आपली कार लावली आणि पटकन उतरून एका बाजूने गाडीची चावी काढली आणि फैयाजला व साजिदला ताब्यात घेतले.