Wed, May 22, 2019 10:16



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे, नवी मुंबई परिसरात 'लोडशेडिंग'

ठाणे, नवी मुंबई परिसरात 'लोडशेडिंग'

Published On: Jun 01 2018 7:22PM | Last Updated: Jun 01 2018 7:22PM



ठाणे : प्रतिनिधी

महापारेषणच्या कळवा येथील ४००/२०० kv EHV सब स्टेशनमध्ये गुरुवारी (दि.31 मे 2018) रात्री बिघाड झाल्यामुळे महावितरणला भारनियमन करावे लागले आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरात महावितरणला भारनियमन करावे लागले आहे. हा बिघाड मोठा असून शनिवारपर्यंत बिघाड दुरुस्त होण्याची शक्यता असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.  

कळव्यातील केंद्रातून महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळा अंतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड (पु. व प.) या परिसरास तर वाशी मंडळा अंतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे एमआयडीसी, कोपरखैरणे, बोनकोडे आदी परिसरात वीज पुरवठा होतो. 

सध्या या सर्व परिसराची वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याच्या महावितरणमार्फत आटोकाट प्रयत्न सुरू आहे. उन्हाळ्यामुळे विजेची मागणी अधिक असते. त्यामुळे विजेची मागणी वाढल्यास सध्या चालू असलेल्या यंत्रणेवर अधिकचा भार येऊन बिघाड होण्याची शक्यता असते. हा बिघाड होऊ नये यासाठी मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरता महापारेषण व महावितरणच्यावतीने विजेचे नियोजन सुरू आहे. महापारेषण व महावितरणचे अभियंते कर्मचाऱ्यांकडून रात्रीपासून बिघाड दुरुस्‍त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, तसेच महावितरण व महापारेषणला सहकार्य करावे असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.