Tue, Nov 13, 2018 23:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम  

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरुध्द महावितरणची विशेष मोहीम  

Published On: Aug 30 2018 8:06PM | Last Updated: Aug 30 2018 8:06PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांविरोधात राज्यभरात महावितरणच्या वतीने १ सप्टेंबर पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात संबंधित ग्राहकांसह रिमोटची निर्मिती करणाऱ्या कंपनी विरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

महावितरणच्या वतीने वीजचोरीला आळा घालण्यासाठी सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. वीजचोरी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवून मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येते. परंतू अलीकडच्या काही वर्षात रिमोटद्वारे वीजचोरी  होत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मुंबईत आज  झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अशा वीजचोरीच्या  विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा व कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम १ सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रिमोटद्वारे वीज चोरी करणारे ग्राहक तसेच संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांनी महावितरणला त्याची माहिती द्यावी. अशा वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या अनुमानित रक्कमेच्या दहा टक्के रक्कम रोख स्वरुपात बक्षीस म्हणून देण्यात येते. तसेच अशी माहिती देणाऱ्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळे अशा वीजचोरीची माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.