Sun, May 26, 2019 18:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत धावणार विजेवर चालणार्‍या बस 

नवी मुंबईत धावणार विजेवर चालणार्‍या बस 

Published On: Dec 09 2017 7:19PM | Last Updated: Dec 09 2017 7:44PM

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

शहरातील वाढते हवा प्रदूषण रोखण्यासाठी तसेच आपल्या बसेसच्या परिवहनावरील खर्च कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिका परिवहनतर्फे (एनएमएमटी) लवकरच विजेवर चालणार्‍या ३० अत्याधुनिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत.

दोन वर्षापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या सभेत विजेवर चालणार्‍या बसेसच्या खरेदीवर चर्चा होवून त्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती. यानंतर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. विशेष म्हणजे शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आपल्या परिवहन विभागासाठी यापूर्वीच सीएनजी आणि हायब्रीड बसेसची खरेदी केली आहे.

यासंदर्भात केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने ३१ ऑक्टोंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात एक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. यानुसार महापालिका प्राधिकरण व त्यांच्या परिवहन उपक्रमांना विजेवर चालणार्‍या बसेसची खरेदी करण्यासाठी तसेच विजेचे चार्जींग स्टेशन उभारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे अनुदान दिले जाणार आहे. याअंतर्गत ३० बसेसची खरेदी व चार्जींग स्टेशन उभारण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. विजेवर चालणार्‍या एका बसची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असून यापैकी ६० टक्के इतके केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार आहे. उर्वरित रक्कम महापालिका स्वत: उभी करणार आहे. चार्जींग स्टेशनसाठी केंद्राकडून १० टक्के इतके अनुदान मिळणार आहे.

सदर बसेस विजेवर चार्ज झालेल्या बॅटरीवर चालतात. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर सदर बस २०० ते २५० किमीपर्यंत धावते. या बसचे विशेष म्हणजे तिच्यात इंजीन असत नाही. यामुळे बसला कसल्याही प्रकारचे हादरे तर बसत नाहीतच शिवाय वायू व ध्वनी प्रदुषणही होत नाही, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. 

देशातील विविध शहरांमध्ये सदर बसेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने फेम इंडिया नावाची योजना सुरु केली आहे.