मुंबई : पुढारी ऑनलाईन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता या जागेसाठी आज (गुरुवार) पोटनिवडणूक होणार आहे. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. मात्र, युतीच्या मतांचे संख्याबळ लक्षात घेता लाड यांचा विजय निचित मानला जात आहे.
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळणार का यावरुन या निवडणुकीला रंगत आली होती. मात्र, शिवसेनेचा टोकाचा विरोध लक्षात घेता भाजपने प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांना अमेदवारी दिली आहे.
संध्याकाळी सात वाजेपर्यंत निकाल
सकाळी ९ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून, मतमोजणी सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
विधानसभेतील आमदारांचे पक्षनिहाय संख्याबळ
भाजप १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ४१, शेतकरी कामगार पक्ष आणि बहुजन विकास आघाडी प्रत्येकी तीन, अपक्ष ७, एमआयएम २, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय समाज पार्टी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष प्रत्येकी एक आमदार आहे.