होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी

अश्‍विनी बिंद्रेप्रकरणी खडसेंच्या भाच्याची चौकशी

Published On: Dec 10 2017 8:25PM | Last Updated: Dec 10 2017 8:25PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी जयकुमार बिद्रे प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील यांना पोलिसांनी जळगाव येथून ताब्यात घेऊन त्यांची काही तास चौकशी केली.   

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय शामसुंदर कुरुंदकर, अश्‍विनी बिद्रे आणि राजेश पाटील हे 15 एप्रिल 2016 रोजी मीरा-भाईंदर येथे होते. मोबाईलच्या लोकेशनवरून ही बाब पुढे आली आहे. याच दिवशी अश्‍विनी बिद्रे शेवटच्या दिसल्या होत्या. पाटील, कुरुंदकर यांच्यात अनेक वेळा मोबाईलवरून यादिवशी बोलणे झाले होते. कुरुंदकर यांच्याशी ज्यांनी ज्यांनी संपर्क साधला, त्या सर्वांची चौकशी होणार आहे.

कोकण भवनात नागरी हक्‍क संरक्षण विभागात कार्यरत असलेले आणि कळंबोलीतील रोडपाळी येथे वास्तव्यास असलेल्या अश्‍विनी बिद्रे 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता आहेत. 14 जुलै 2016 रोजी त्या बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या नातेवाइकांकडून दाखल करण्यात आली होती. 31 जानेवारी 2017 रोजी बिद्रे यांचे अपहरण झाल्याची तक्रार कळंबोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. गेल्या आठवड्यात गुरुवारी अभय कुरुंदकर यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांना 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

कोण आहेत राजेश पाटील? 

नाशिक : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील  हे बोदवड तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी आहेत. तळवेल हे गाव मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर असून याच महामार्गावर पाटील यांचे ‘सहेली’ नावाचे हॉटेल आहे. सध्या हे हॉटेल दुसर्‍यास चालविण्यास दिले आहे. काही वर्षांपूर्वी पाटील हे स्वतःच हॉटेल चालवत होते. पाटील यांचे मोठे बंधू सुधाकर पाटील हे जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.