होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खडसेंना एसीबीची क्लीन चिट

खडसेंना एसीबीची क्लीन चिट

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:49AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे व जमीन खरेदीत शासनाचे नुकसान झाल्याचे आढळून आले नसल्याचे अहवालात म्हटले असून हा अहवाल पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केला आहे. या अहवालामुळे खडसेंना मोठा दिलासा मिळाला आहे. 

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून 3 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली होती. या जमिनीची किंमत सुमारे 31 कोटी रुपये असताना ही जमीन खडसे कुटुंबीयांनी अवघ्या पावणेचार कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.
एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीच रेडी रेकनर दरापेक्षा कमी बाजारमूल्य दाखवून ही जमीन खरेदी केली. तसेच ही जमीन एमआयडीसीत येत असून या जमिनीचे संपादन झाले असताना ही जमीन खरेदी करून शासनाच्या हिताला बाधा आणल्याचा आरोपही खडसे यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंचा राजीनामा घेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली होती. तसेच या जमीन व्यवहाराची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही चौकशी सुरू होती.

पुणे एसीबीने याप्रकरणी आता पुण्यातील न्यायालयात अहवाल सादर केला आहे. या अहवालात खडसेंवरील आरोप सिध्द झाले नसल्याचे व या जमीन खरेदी प्रक्रियेत शासनाचे नुकसान झालेले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसीबीचा हा अहवाल त्यांना दिलासा देणारा आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसीबीच्या अहवालाबाबत आपणास काहीही माहीत नसल्याचे स्पष्ट केले. एसीबीचा अहवाल आपल्याकडे आला नाही. तो थेट कोर्टाला सादर झाला असे ते म्हणाले.