Thu, Jun 27, 2019 10:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात सुशिक्षित बेरोजगार वाढले

राज्यात सुशिक्षित बेरोजगार वाढले

Published On: Apr 23 2018 1:17AM | Last Updated: Apr 22 2018 11:23PMमुंबई : प्रतिनिधी

सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेल यासाठी हक्‍काचे व्यासपीठ मिळेल म्हणून सेवायोजन कार्यालयांकडे पाहिले जात होते; पण ही संकल्पनाच आता मोडीत निघाली असून, कामाच्या शोधात असलेल्या व्यक्‍तींची नोंदणी केवळ नोंदणी करण्याचा सोपस्कार पार पाडला जात आहे. यामुळे सुशिक्षित बेकारीचा आलेख दिवसेंदिवस चढत असून, राज्यातील नोंदणीकृत बेकारांची संख्या 38 लाखांच्या वर पोहोचली आहे. यामध्ये 9 लाख 44 हजार महिला उमेदवार आहेत.

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पापूर्वी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात सुशिक्षित बेकारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असली तरी त्या तुलनेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सरकारला अपयश आल्याचे विदारक चित्र मांडण्यात आले आहे. नोंदणीकृत बेकारांत 18 टक्के पदवीधर, 6 टक्के पदवीकाधारक, 3 टक्के पदव्युत्तर पदवीकाधारक तर दहवी/बारावी उत्तीर्ण 28 टक्के सुशिक्षित बेकार राज्यात आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाकडील नोंदणीनुसार मागील वर्षी 5 लाख 39 हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. सरकारी कार्यालयातील नोकरभरतीवर असलेल्या निर्बंधामुळे नोंदणी केलेल्या सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नाही, खासगी आस्थापनांमध्ये अलीकडच्या काळात नोकरीच्या ज्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यासाठी आवश्यक नसल्याने बेकारांच्या संख्येत घट होण्याऐवजी ती वाढतच आहे.