Wed, Jan 23, 2019 15:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्‍नपत्रिकेतून उगवणार झेंडूचे रोपटे!

लग्‍नपत्रिकेतून उगवणार झेंडूचे रोपटे!

Published On: Feb 16 2018 10:44AM | Last Updated: Feb 16 2018 10:44AMअंबरनाथ : प्रतिनिधी

वाढदिवस, नामकरण समारंभ, विवाह समारंभ अशा वेगवेगळ्या समारंभासाठी महागड्या पत्रिका छापून मित्रमंडळी, आप्‍तेष्ट यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न अनेक जण करीत असतात. मात्र त्याला अपवाद ठरणारी लग्‍नपत्रिका स्वप्नील बागुल या तरुणाने आपल्या विवाहनिमित्त तयार केली असून ही निसर्गप्रेमी पत्रिका सध्या अंबरनाथमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. लग्‍नानंतर अनेक जण आपल्याकडे आलेल्या पत्रिका नष्ट करतात. मात्र या पत्रिकेतून घरच्या घरीच झेंडूचे रोपटे उगवणार आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील वडवली येथील रहिवासी आणि मनसेचे माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांच्या विवाहनिमित्त 20 फेबु्रवारी रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या स्वागत समारंभासाठी बागुल कुटुंबीयांनी आकर्षक अशा पर्यावरणपूरक निमंत्रण पत्रिका छापल्या आहेत. लग्‍न समारंभानंतर अनेक जण आपल्याकडे आलेल्या पत्रिका नष्ट करीत असतात. मात्र स्वप्नील बागुल यांनी छापलेली पत्रिका ही आगळीवेगळी असून ती पर्यावरणपूरक आहे.

या पत्रिकेमध्ये झेंडूच्या फुलाचे बीज टाकण्यात आले आहे. त्यामुळे लग्‍न समारंभानंतर ही पत्रिका फेकून न देता या पत्रिकेचा कागद रात्रभर पाण्यात ठेवावा. एका कुंडीमध्ये माती व खत यांचे मिश्रण तयार केल्यानंतर त्यात पाण्यात भिजवलेला कागद एक चतुर्थांश मातीत पुरून ठेवल्यावर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवावी. त्यामध्ये दररोज पाणी टाकल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांत या मातीत झेंडूचे लहानसे रोपटे उगवलेले पाहायला मिळेल. काही दिवसांतच या रोपट्याला मोहक असे झेंडूचे फूल उमललेले पाहायला मिळेल. बागुल यांनी पत्रिकेच्या दर्शनी भागावरच या सर्व प्रक्रियेची माहितीदेखील छापली आहे. त्यामुळे निमंत्रितांना पत्रिका हाती पडताच त्यांच्या तोंडून प्रशंसा व्यक्‍त होत आहे.