होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भूकंपाच्या धक्क्याने जव्हार पुन्हा हादरले

भूकंपाच्या धक्क्याने जव्हार पुन्हा हादरले

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 26 2017 1:05AM

बुकमार्क करा

जव्हार : वार्ताहर

जव्हार तालुक्याला गेल्या आठवड्यात (20 डिसेंबर) भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली. येथे भूकंपमापक यंत्रणा अस्तित्वात नसल्याने जियोलॉजिस्ट पथकाची प्रतीक्षा कायम असतानाच सोमवारी सकाळी पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवल्याने जव्हारकर नागरिक पुरते हादरून गेले. तालुक्यात अद्याप जियोलॉजिस्ट पथक न पोहोचल्याने भूकंपाने तालुका उद्ध्वस्त झाल्यानंतर पथक दाखल होणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.

20 डिसेंबर रोजी तालुक्यातील वाळवंडा, खडकीपाडा, पाथर्डी परिसर भूकंपाने हादरला. यानंतर पुन्हा सोमवारी वाळवंडा परिसरातील गावे व जव्हार शहराला सकाळी सव्वा सातच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. यामुळे जव्हारकर भयभीत झाले असताना सरकारी यंत्रणेने अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत. 4 वर्षांपूर्वी जव्हार तालुका भूकंपाने हादरल्यानंतर शहरात दोन भूकंपमापक यंत्रे बसवण्यात आली. गेल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने तहसीलदार संतोष शिंदे भूकंपाची तिव्रता किती नोंदवली गेली याची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे भूकंपमापक यंत्रे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भूकंपाची तीव्रता मोजता आली नाही. येत्या आठवडाभरात तालुक्यात पुन्हा भूकंपाची तीव्रता मोजणारी यंत्रे बसवली जातील तसेच जियोलॉजिस्ट पथकाला तातडीने पाचारण केले जाईल, असे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले. मात्र, आठवडाभरात तालुका दुसर्‍यांदा हादरूनही भूकंपमापक यंत्रे बसली नसून जियोलॉजिस्ट पथकही दाखल न झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

भूकंपामुळे तालुका उद्ध्वस्त होऊन आमचे बळी गेल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी होणार का, असा उद्विग्न सवाल नागरिकांनी केला आहे. जियोलॉजिस्ट पथकाबाबत तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता, जव्हार परिसरात गेल्या आठवड्यात व सोमवारी झालेल्या भूकंपाच्या तीव्रतेच्या धक्क्यांबाबत पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांना कळवले आहे. हा अहवाल मंत्रालयात पाठवल्याची माहिती त्यांनी दिली.