Thu, Feb 21, 2019 07:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत लोकल ट्रेनच्या महिला  डब्यात तरुणाचे विकृत चाळे

मुंबईत लोकल ट्रेनच्या महिला  डब्यात तरुणाचे विकृत चाळे

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:10AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हार्बर मार्गावर महिलांच्या डब्यात घुसलेल्या तरुणाने डब्यातील महिला प्रवाशासमोर विकृत चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महिला प्रवाशाने तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

शुक्रवारी सीएसएमटी-पनवेल लोकलने जितेश उतेकर हे प्रवास करत होते. उतेकर हे फर्स्ट क्लासलगतच्या डब्यातून प्रवास करत होते. दुपारी दोन-अडीचची वेळ असल्याने ट्रेनला फारशी गर्दी नव्हती. ट्रेन सीएसटीएम स्थानकातून बाहेर पडताच फर्स्ट क्लासच्या डब्यातून एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. उतेकर यांनी महिला डब्यात जाळीतून बघितले असता डब्यात महिलेशेजारी एक तरुण बसलेला दिसला. हा तरुण माझ्यासमोर विकृत चाळे करत आहे, असे त्या महिलेने उतेकर यांना सांगितले. उतेकर व अन्य प्रवाशांनी आरडाओरडा करताच त्या तरुणाने पँटची चेन बंद केली आणि दरवाज्याजवळ जाऊन उभा राहिला. मस्जिद स्थानक येताच त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि रुळ ओलांडून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवरुन पळून गेला.

उतेकर हे तक्रार दाखल करण्यासाठी वडाळा रेल्वे पोलिसांकडे गेले. त्यांनी सीएसटीएम पोलिसांकडे जाण्यास सांगितले. सीएसएमटी पोलिसांनी उतेकर यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी दिलेला विकृत तरुणाचा फोटोही पोलिसांना घेतला. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही, असे उतेकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. ज्या महिलेसोबत हा प्रकार घडला त्या तक्रार दाखल करण्यास न आल्याने गुन्हा दाखल करता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले.तोवर उतेकर यांनी सोशल माध्यम ट्विटरच्या माध्यमातून तसेच रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकार्‍यांना मेसेजद्वारे घटनेची माहिती दिली होती. त्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केल्याचे उतेकर यांनी म्हटले आहे.