Thu, Apr 25, 2019 05:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डम्पिंग प्रश्न सुटला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार

डम्पिंग प्रश्न सुटला नाही तर निवडणुकीवर बहिष्कार

Published On: Mar 19 2018 1:37PM | Last Updated: Mar 19 2018 1:37PMडोंबिवली : वार्ताहर

गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे ठरलेले कल्याणातील डम्पिंग ग्राऊंड तातडीने हटवण्याच्या मागणीसाठी आज कल्याणकर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. लवकरात लवकर डम्पिंगचा प्रश्न सोडवला नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.

गेल्या आठवड्यात कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडने अतिशय उग्र रूप धारण केलेले पाहायला मिळाले. या ठिकाणी लागलेली आग तब्बल आठ दिवस जळत होती. या आठ दिवसात आगीमुळे कल्याण पश्चिमेतील नागरिकांनी प्रचंड त्रास सहन करावा लागला. डम्पिंगवरील आगीच्या धुराने तर ज्येष्ठ नागरिकांसह वृध्द नागरिकांना याचा त्रास जास्‍त झाला.

कल्याण डोंबिवली महापालिका गेल्या अनेक महिन्यांपासून डम्पिंग हटवण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र हे आश्वासन आणि पालिकेची डम्पिंग हटवण्याची कार्यवाही केवळ कागदावरच असल्याचे दिसत आहे. डम्पिंगच्या या जाचाला कंटाळून अखेर कल्याणकर पुन्हा एकदा एकवटले आहेत. लाल चौकीजवळील फडके मैदानातून मूक मोर्चा काढत त्यांनी पालिकेविरोधात एल्गार पुकारल्याचे दिसून आले. तसेच लवकरात लवकर डम्पिंगचा प्रश्न मार्गी न लावल्यास येणाऱ्या काळात निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. त्यामूळे एवढी वर्ष खितपत पडलेला डम्पिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका आता किती गंभीर होते हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे.