Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अथर्ववर गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार 

अथर्ववर गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार 

Published On: Jul 05 2018 1:39AM | Last Updated: Jul 05 2018 1:16AMडोंबिवली : वार्ताहर 

घराबाहेर खेळताना अचानक बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या अथर्व वारंग या चिमुरड्याच्या हत्याकांडाला दीड महिन्यानंतर कलाटणी मिळाली आहे. उत्तरीय तपासणी करणार्‍या डॉक्टरांना या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा संशय आल्याने उत्तरीय तपासणीसाठी सदर मृतदेह मुंबईला पाठवला होता. अखेर याबाबत वैद्यकीय (रासायनिक पृथ्थकरण) अहवाल प्राप्त झाला असून यातून धक्कादायक खुलासा झाला आहे. सैतानी नराधमांनी या चिमुरड्याचे अपहरण केल्यानंतर गुंगीचे औषध पाजून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर हत्येच्या उद्देशाने त्याला ड्रेनेजच्या टाकीत फेकून दिल्याचे उघड झाले आहे.

 डोंबिवली देसलेपाडा येथे राहणारा अथर्व हा 24  मे रोजी खेळता खेळता घराबाहेरून बेपत्ता झाला. 25 मे रोजी या मुलाचा मृतदेह जवळच्या ड्रेनेजच्या टाकीत सापडला होता. मात्र तपासणीअंती डॉक्टरांना अथर्ववर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा संशय आल्याने त्याचा मृतदेह तपासणीसाठी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला होता. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील असाच संशय व्यक्त केल्याने मृतदेहाचे अवशेष रासायनिक पृथ्थकरण प्रक्रियेसाठी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे धाडण्यात आले होते. याच दरम्यान मानपाडा पोलिसांनी अथर्वच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवला. 

ड्रेनेजच्या टाकीला झाकण नसल्याने त्याची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला होता की, त्यात पडून त्याचा मृत्यू झाला होता, की त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत त्याचा मृतदेह ड्रेनेजच्या टाकीत फेकून दिला, याबाबत विविध तर्क लावत पोलिसांनी तपास सुरू केला. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. याच दरम्यान अथर्वच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ड्रेनेजच्या टाकीत मृतदेह आढळून आला त्या इमारतीच्या सय्यद हसन अहमद, मोनिस अहमद, ऐमान खान, नागेंद्र सिंग आणि विशाल सिंग या पाच बिल्डर विरोधात इमारत बांधकाम करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर या पाचही बिल्डरांना अटक करण्यात आली.