होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विदेशी तरुणाशी लग्‍नाचे स्वप्न अधुरे

विदेशी तरुणाशी लग्‍नाचे स्वप्न अधुरे

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 1:06AMठाणे : प्रतिनिधी

विवाह जुळवणार्‍या भारत मॅट्रिमोनियल साईटवरून अनोळखी विदेशी व्यक्तिशी झालेली मैत्री ठाण्यातील कासारवडवली परिसरात राहणार्‍या एका नोकरदार 27 वर्षीय तरुणीला चांगलीच महागात पडल्याचे समोर आले आहे. नेटवरून झालेल्या मैत्रीनंतर आपण भारतात येऊन तुझ्याशी लग्न करणार असल्याचे वचन या तथाकथित विदेशी व्यक्तीने सदर तरुणीला दिले होते. मात्र या तथाकथित विदेशी इसमाने तक्रारदार तरुणीबरोबर लग्न तर केले नाहीच, पण भेट होण्याआधीच त्याने एका महिलेच्या मदतीने तिला 2 लाख 53 हजार रुपये रकमेचा गंडाही घातला. 

कासारवडवली परिसरातील जीबी रोड येथे राहणार्‍या 27 वर्षीय तक्रारदार तरुणीने विवाह जुळवणार्‍या भारत मॅट्रिमोनियल या वेबसाईटवर नोंदणी केली असून तिला 31 मे 2018 रोजी रजीथ वेलीयल नामक विदेशी नागरिकाने रिक्वेस्ट पाठवली होती. तरुणीने 12 जून 2018 रोजी ही रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर या विदेशी नागरिकाने तरुणीशी व्हॉट्सअ‍ॅपवरून संपर्क वाढवला. या तथाकथित भामट्याने फाईसलँड, नेदरलँड येथे राहत असल्याचे सांगत माझ्या वडिलांना प्रॉपर्टीच्या वादातून नातेवाईकांनी मारून टाकले असून मला भारतात स्थायिक व्हायचे आहे अशी बतावणी केली. त्याचप्रमाणे तो प्लास्टिक सर्जन असल्याचे देखील त्याने तरुणीस सांगितले. इतकेच नव्हे तर या भामट्याने आपल्या आईसोबत देखील तरुणीचे व्हॉट्सअ‍ॅप कॉल वरून बोलणे करून देत आम्ही लवकरच भारतात येत असल्याचे भासवले.  तसेच परकीय चलनाच्या नावाखाली सदर तरुणीस 2 लाख 53 हजाराचा गंडा घातला. त्यासाठी एका महिलेचाही वापर केला.

त्यानंतर रजिथ वेलीयल याने आपला मोबाईल बंद केला. वारंवार संपर्क करून देखील त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तरुणीने याप्रकरणी 6 जुलै रोजी कासारवडवली पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी तथाकथित विदेशी नागरिक आणि मोनिका शर्मा नामक तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.