Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान दुर्लक्षित

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान दुर्लक्षित

Published On: Dec 04 2017 7:22AM | Last Updated: Dec 04 2017 7:22AM

बुकमार्क करा


माटुंगा : कांचन जांबोटी

घटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कॉलनी, दादर येथील राजगृह हे निवासस्थान सर्वांना परिचित आहे. पण त्याअगोदर बाबासाहेब
परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसर्‍या माळ्यावर खोली क्र. 50, 51 या ठिकाणी वास्तव्यास होते. 1912 ते 1934 या कालावधीत 22 वर्षे ते येथेच राहायचे. या ऐतिहासिक स्थळाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची खंत येथे भेट देणारे नागरिक व्यक्‍त करतात.

या ऐतिहासिक जागेला पाहण्यासाठी बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी येतात. खोली क्रमांक 50 मध्ये आता निवेदिता ताडीलकर या आपल्या दोन
मुलांसोबत राहतात. बाबासाहेबांसोबत त्यांचे सहकारी कालिदास ताडीलकर हे अगदी सावलीप्रमाणे नेहमी असायचे. बाबासाहेब जेव्हा राजगृह येथे स्थलांतरित झाले तेव्हा ही खोली त्यांनी कालिदास ताडीलकर यांना कायमस्वरूपी राहण्यास दिली. खोली क्र. 51येथे रमाबाई आंबेडकर यांचे निकटवर्तीय (नातलग) राहतात. भागूराम खैरे त्यांच्या पत्नी व मुलगा असा त्यांचा परिवार येथे आहेत. या दोन्ही खोल्या बाबासाहेबांनी या परिवारांना दिल्या आहेत. 

जगातील सर्वांत विद्वान व्यक्‍तीने जिथे काही काळ घालवला तेथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान आहोत, अशा शब्दांत दोन्ही कुटुंबीयांनी भावना व्यक्‍त केली. खोली क्र. 50 मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र.51 स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराज देखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीण देखील मानले. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसहाय्य महाराजांनी केले आहे. 

गेल्या महिन्यातच अमेरिका, कोलंबिया येथून 20 जणांचे शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेले. जर्मनीहून एक वयोवृद्ध महिला या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा भागूराम खैरे यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी जर्मन महिला चक्क शुद्ध हिंदी भाषेत म्हणाल्या, बाबासाहेबांनी नमस्कार करायला नाही तर गळे मिळायला शिकवलं आहे. आपण सर्व त्यांचे अनुयायी आहोत कोणी मोठे छोटे नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दोन्ही खोल्यांमधील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ बांधले आहे.