Tue, Apr 23, 2019 19:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग: उध्दारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्‍मामुळे...

ब्लॉग: उध्दारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्‍मामुळे...

Published On: Dec 06 2017 9:17AM | Last Updated: Dec 06 2017 8:35PM

बुकमार्क करा

- महादेव कांबळे

उध्दारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्‍मामुळे या भीमगीतातूनच शाहीर वामनदादा कर्डक यांनी भीमराव रामजी आंबेडकर या महामानवाचे स्‍थान अधोरेखित केले आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी रामजी आणि भीमाबाई यांच्या पोटी भीमराव रामजी आंबेडकर यांचा मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी महार कुटुंबात जन्‍म झाला.  

बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे मूळचे महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील आंबवडे गावचे. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषेत थोडे शिक्षण मिळाले होते. यामुळेच रामजी यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली. 

बाबासाहेबांच्या वडीलांनी १८९८ साली आपले कुटुंब मुंबईला हलविले. मुंबईतील एलफिन्स्टन मार्गावरील सरकारी शाळेतील भीमराव आंबेडकर हे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. १९०७ साली मॅट्रिक परीक्षा पास होऊन १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात त्‍यांनी प्रवेश घेतला. एलिफिन्‍सन महाविद्यालयातील त्यांचा प्रवेश हा दलित समाजासाठी गौरवाची बाब होती. म्‍हणून यावेळी बाबासाहेबांचा त्‍यावेळी मोठा सत्‍कारही करण्यात आला होता. शाळेत असतानाच १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९) यांच्याबरोबर करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भारतीय इतिहासात सर्वांगाने अभ्यास झाल्यानंतरही एवढ्या दिर्घ कालाखंडानंतर असा कोणता विषयी बाबासाहेबांविषयी राहिला आहे का? हा पुन्‍हा संशोधनाचा विषयी होऊ शकेल. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकिय, कायदा, शैक्षणिक, सांस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, महिलांचा विकास, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे बाबासाहेबांना आधुनिक भारताचे जनक म्‍हणून ओळखले जाते. 

देशातील मागास समाजाच्या वाट्याला आलेल्या नरकमय जीवनातून सुटका करणार्‍या बाबासाहेबांना अनेक बिरूदावलीने उल्‍लेखले जाते. एकाच वेळी भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री, मानवी हक्कांसाठी लढणारे मानवतावादी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक अशा अनेक अर्थाने बाबासाहेबांनी देशातील सर्व क्षेत्राशी संबंधित क्षेत्राला आपले मोठे योगदान दिले आहे. याबरोबरच बाबासाहेबांच्या सामाजिक योगदानामुळेच त्यांना विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, धूरंधर, यूगधंर, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधी बाबासाहेबांना लावण्यात येतात.

बाबासाहेबांच्या जीवनाला महाविद्यालयीन शिक्षणानंतर खर्‍या अर्थानी  कलाटणी मिळाली. अमेरिकेतील शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी प्रति महिना २५ रुपये शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. यानंतर १९१२ साली अर्थशास्‍त्र आणि राज्यशास्‍त्रातून त्यांनी पदवी संपादन केली.

बडोदा संस्‍थानाचे स्‍कॉलर असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र शाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी यावेळी प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्रआणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्‍यांनी केला. या काळातच बाबासाहेबांच्या वडीलांचे २ फेब्रुवारी, १९१३ मुंबईमध्ये निधन झाले.

कोलंबिया विद्यापीठातील ग्रंथालयातील बाबासाहेबांचा अभ्यासाचा काळ मोठ्या अभिमानाने आजही भारतीय नागरिक सांगतात. कोलंबिया विद्यापीठातील ग्रंथालयामध्ये बाबासाहेब सर्वांच्या आधी हजर असायचे याचे कौतुक पंजाब केसरी लाला लजपतराय यांना होते. यावेळी बाबासाहेबांची त्‍यांनी भेट घेतली तेव्‍हा अर्थतज्ञ प्रा. सेलिग्मन यांनी लजपतराय यांना सांगितले की, बाबासाहेब हे फक्‍त भारतीयांच्यामध्येच चर्चेचा विषय नाही तर अमेरिकेतील विद्यार्थ्यांमध्येही अभ्यासाविषयी प्रसिध्द आहेत. 
जागतिक किर्तीच्या या अर्थशास्‍त्रज्ञाने नंतर बाबासाहेबांना मार्गदर्शक म्हणून अनेक वेळा काम केले आहे. प्रा. सेलिग्मन यांच्याविषयी बाबासाहेब नेहमी आदराने सांगत की, माझ्या अमेरिकेतील वैयक्‍तिक विकासास कोणाचा हातभार लागला असले तर तो प्रा. सेलिग्मन यांचा. सेलिग्मन यांच्याशी असलेले घनिष्ठ नातेसंबंध डॉ. बाबासाहेब यांनी कायम जोपासले. सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना आंबेडकरांनी अनेक विद्यार्थ्यांना कोलंबिया विद्यापीठात प्रा. सेलिग्मन यांच्याकडे पाठवले होते.

मनूवादी विचारसरणीवर चाललेली समाजरचना बाबासाहेबांच्या शिक्षणानंतर कधीच मान्य नव्‍हती. अमेरिकेतील त्‍यांच्या शिक्षणामुळे समानतेची मुळे त्‍यांच्या स्‍वभावात रूजली. म्‍हणून भारतात आल्यावर त्‍यांनी समतेची लढाई सुरू केली. 

जातीवर अधारित असलेल्या समाजरचनेची चिकित्‍सा करून जात ही श्रमविभागणीवर अवलंबून नाही. समाजातील कामे जातीमुळेच तयार केली जातात. कुवतीनुसार कामांची निर्मिती केली जात नसून जन्‍मावरून किंवा आई-वडीलांच्या स्‍थानानुसारच केली जाते असे बाबासाहेब सांगत.

बाबासाहेब बॅरिस्‍टर होऊन भारतात परतले तेव्‍हाही त्‍यांना अस्‍पृश्यतेचा कटू अनुभव आला. बार लायब्ररीमध्ये ते ज्या टेबलावर बसत त्या टेबलाकडे उच्चभ्रू समाजातील वकील जातही नसत. या अशा घटनेतूनच बाबासाहेबांचा अस्‍पृश्यतेचा लढा तीव्र होत गेला. 

दलित, मागास समाजातील अन्‍यायाला वाचा फोडण्यासाठी म्‍हणून मूकनायक वृत्तपत्राची सुरूवात बाबासाहेबांनी केली. या वृत्तापत्रातून त्‍यांनी सनातनी वृत्तीवर, हिंदू नेत्यांवर जातीभेदाविरूध्द सडकून टीका केली. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुध्द भारत यांचे वृत्तपत्रातील योगदान मोठे आहे. 

देशातील अस्‍पृश्यतेविरूध्द लढा देण्यासाठी विविध मार्गांनी बाबासाहेबांनी लढा दिला. यासाठी बाबासाहेबांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी महाड येथे कुलाबा परिषद भरविली. या परिषदेमध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्यासाठी ठराव पास करण्यात आला. व २० मार्च १९२७ रोजी पाण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली.  सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजात बरोबरीत आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर करून त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधीची मागणी केली. 

हिंदू समाजातील सर्वश्रेष्ठ मानला जाणार मनुस्‍मृती ग्रंथ म्‍हणजे दलितांना नरकयातना भोगायला लावणारा असा उल्‍लेख अनेक विचारवंत करतात. या मनुस्‍मृतीमुळे भारतातील दलित समाजाचे नुकसान झाल्याचे बाबासाहेब म्‍हणतात. म्‍हणून त्यांनी मनुस्मृतीचे २५ डिसेंबर इ.स. १९२७रोजी समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले. 

माणसांना माणसासारखी वागणूक मिळावी यासाठी मंदिर प्रवेश, सामाजिक ठिकाणी प्रवेश असे कार्यक्रम बाबासाहेबांकडून राबविण्यात आले. म्‍हणून बाबासाहेबांनी मंदिर सत्‍याग्रह केले. बाबासाहेबांनी दलितांसाठी जसे महान कार्य केले, त्‍याचप्रकारे त्‍यांनी शेतकर्‍यांच्या हक्‍कासाठीही लढा दिला. १९२८ पासूनच डॉ. आंबेडकरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले. कोकणातील शेतकऱ्यांची खोतांच्या दास्यातून मुक्तता व्हावी म्हणून १४ एप्रिल १९२९ रोजी रत्नागिरी जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजित केली. या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. १७ सप्टेंबर१९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणा-या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते. 

पीडित, शोषित, दलितांचे प्रतिनिधी म्‍हणून लंडनमधील गोलमेज परिषदेत आंबेडकर उभा राहिले. यावेळी त्‍यांनी इंग्रजांनी भारत सोडावा असा इशारा त्यांनी ब्रिटीशांना त्यांच्याच भूमित दिला होता. बाबासाहेबांनी दलितांच्या लढ्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकिय जागृतीचे मोठे कार्य केले. सर्व पातळीवर संघर्ष करूनही जर दलितांना माणूस म्‍हणून वागणूक मिळत नसेल तर धर्मांतराशिवाय पर्याय नसल्याचे सांगून बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली धर्मांतराची घोषणा केली. बाबासाहेबांच्या बौध्दधम्‍माचा स्‍वीकार केल्यानंतर काही दिवसातच म्‍हणजे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्‍लीतील अलिपूर रोड येथे बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.