Thu, Apr 25, 2019 21:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतमालाला हाऊसिंग सोसायट्यांची दारे खुली

शेतमालाला हाऊसिंग सोसायट्यांची दारे खुली

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना कृषीमालाचा योग्य भाव मिळावा, तसेच तो ग्राहकांनाही किफायतशीर दरात देता यावा, यासाठी मुंबईत गृहनिर्माण संस्थांमध्येही ‘अटल महापणन विकास अभियानांतर्गत’ कृषीमाल विक्री केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनची मालकी असलेल्या 68 दुकानांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. 28 जून रोजी मुंबई विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची एक बैठक अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये पार पडली असून या योजनेवर कार्यवाहीही सुरू झाली आहे.  

या बैठकीस गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींबरोबरच सहकार विभागाचे पदाधिकारी तसेच पंजाब मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकार्‍यांनीही भाग घेतला. शिवाय बैठकीपूर्वी शेर-ए-पंजाब को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कृषीमाल विक्री केंद्रासाठी निवडण्यात येत असलेल्या जागेची पाहणी करण्यात आली. त्याशिवाय मार्केटिंग फेडरेशनच्या मालकीच्या असलेल्या डी. एन. नगर येथील दुकानालाही भेट देण्यात आली.

शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला एकीकडे भाव मिळत नाही. त्याचवेळी ग्राहकांनाही अव्वाच्या सव्वा भावात शेतमाल खरेदी करावा लागतो. या साखळीत शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना त्याचा आर्थिक फटका बसतो व मधल्यामध्ये दलाल नावाचा घटक मात्र गुबगुबीत होतो. यातून मार्ग काढण्यासाठी सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यात ‘अटल महापणन विकास अभियान’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व ग्राहक यांचा फायदा होणार असल्याने जास्तीत जास्त हाऊसिंग सोसायट्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सभेला पंजाब मार्केटिंग फेडरेशनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक शर्मा, सहकार, पणन मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राजाराम दिघे, मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक मोहम्मद आरिफ यांच्याबरोबरच महेंद्र मस्के, प्रताप पाटील आदी शासकीय अधिकारीही उपस्थित होते.