Mon, Mar 18, 2019 19:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलाला पाळणाघरात सोडून गेलेल्या आईचा शोध 

मुलाला पाळणाघरात सोडून गेलेल्या आईचा शोध 

Published On: Jan 20 2018 1:50AM | Last Updated: Jan 20 2018 1:41AMडोंबिवली : वार्ताहर

पाळणाघरात आपल्या पाच वर्षाच्या मुलाला चार महिन्यांपूर्वी सोडून निघून गेलेल्या बेपत्ता मातेचा मानपाडा पोलिसांनी अखेर शोध लावला आहे. या मुलाला येत्या दोनच दिवसात आईची भेट घडवून तिच्या स्वाधीन करणार असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितलेे. या मातेने आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने आपल्या 5 वर्षाच्या मयूरला डोंबिवली निळजे येथील पाळणाघर चालविणार्‍या किरण शेट्टी यांच्याकडे ठेवले होते. पण ऑगस्ट 2017 पासून ती माता मयूरला पाहण्यासाठी येत नसल्याने व आपणही त्या मुलाचा किती काळ सांभाळ करणार, या विवंचनेत शेट्टी या पडल्या होत्या. शेट्टी यांनीच मानपाडा पोलीस ठाण्यात सर्व हकीकत सांगून तक्रार दाखल केली.

शेट्टी यांच्याकडे संबंधित महिलेचा मोबाईल नंबर असल्याने मानपाडा पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला आणि तिचा शोध लावला.  त्या मातेने आपण आजारी असून,  गुजरातला एका रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले. येत्या दोन-तीन दिवसात डोंबिवलीत येऊन मयुरेशला घेऊन जाऊ असे सांगितले. या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनीही मयुरेशच्या आईचा शोध लागला असल्याचे सांगितले.