Sat, Apr 20, 2019 23:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर होणार कारवाई

कल्याण-डोंबिवलीत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर होणार कारवाई

Published On: Mar 05 2018 5:01PM | Last Updated: Mar 05 2018 5:01PMडोंबिवली : वार्ताहर

विनाहेल्मेट कल्याण-डोंबिवलीतील बाह्य व अंतर्गत रस्त्यांवर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस येत्या 12 मार्च अर्थात सोमवारपासून कठोर कारवाईचा बडगा उगारणार आहेत. या संदर्भात वाहतूक पोलिसांनी परीसुचना देखील जारी केली आहे. 

वाहन चालविताना नियम पाळावेत, अपघात मुक्त प्रवास करावा, सुरक्षित प्रवास कसा करावा, डोके नसणारा मनुष्य अशा प्रकारची विविध प्रबोधन करणारे कार्यक्रम वाहतूक पोलिसांच्या मार्फत कल्याण-डोंबिवलीमध्ये राबविण्यात आले होते. तथापी वाहन चालकांचा काही बेशिस्तपणा थांबलेला नाही. यावर नियंत्रण आणण्यासाठी सोमवार (12 मार्च) पासून कल्याण-डोंबिवली शहरात दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट सक्तीचे असून, वाहन चालका सोबत जो सहकारी (मागे बसलेला) असेल त्यालाही हेल्मेट सक्तीचे असून, नियम न पाळल्यास 500 रूपयांचा दंड भरावा लागणार असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

दुचाकी चालविताना अपघात झाल्यास डोके सोडून इतर अवयवांना दुखापत झाल्यावर फार तर अपंगत्व येते. मात्र डोक्यातील मेंदू हा अतिशय संवेदनशील असुन अपघातात जबर दुखापत झाल्यास जीव जाण्याची शक्यता असते. अशा जबर दुखापतीपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता दुचाकी चालविताना चालकाने आणि आणि त्याच्या मागे बसणाऱ्या सहकाऱ्याला देखील हेल्मेट बंधनकारक आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलीस नाक्या-नाक्यांवर थांबून करडी नजर ठेवणार आहेत. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीमध्ये सोमवारपासून हेल्मेट सक्तीच्या या निर्णयाचे प्रवासी संघटनेने स्वागत केले आहे. सोमवारी सकाळपासून कल्याण-डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांमार्फत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेला सहकारी याने हेल्मेट घालून प्रवास करावा अन्यथा त्यांच्या मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 129 / 177 अन्वये 500 रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तरीही वाहन चालकांनी नियमाचे पालन करत हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी या पत्रकामार्फत केले आहे.