Sun, Nov 18, 2018 01:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बळीराजासाठी 'त्‍या दोघींचा' अन्नत्‍याग

बळीराजासाठी 'त्‍या दोघींचा' अन्नत्‍याग

Published On: Mar 19 2018 6:22PM | Last Updated: Mar 19 2018 6:26PMडोंबिवली : वार्ताहर

19 मार्च 1986 रोजी यवतमाळ येथे एका शेतकऱ्याने परिस्थितीला कंटाळून कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या दुर्दैवी घटनेला आज 32 वर्ष पूर्ण झाली असून, अजूनही शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी संवेदनेची जाणीव सरकारला करून देण्यासाठी डोंबिवलीकर दोन महिलांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. 

मंजिरी खानोलकर आणि प्रमिला करूणाकर असे या दोन महिलांची नावे असून, डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात अन्नत्याग आंदोलन केले. साहेबराव करपे आणि मालती करपे हे आपल्या कुटुंबासह यवतमाळ जिल्ह्यात राहत होते. करपे दाम्पत्य शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीचे उत्पन्न बुडाल्याने कर्जाचा डोंगर डोक्यावर होता. दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास कमी पडल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. अखेर परिस्थितीला कंटाळून करपे यांनी आपली पत्नी मालती आणि चार मुलांसह आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेला 32 वर्ष पूर्ण झाली असूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या संवेदना राज्य सरकारला कळाव्यात म्हणून डोंबिवलीतील मंजिरी खानोलकर आणि प्रमिला करूणाकर या दोन महिलांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात अन्नत्याग आंदोलन केले. याबाबत खानोलकर म्हणाल्या की, आज राज्यात सर्वत्र अन्नदान आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. बळीराजा जगला पाहिजे. यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी भावना या दोन महिलांनी यावेळी व्यक्‍त केली. अखेर दिवसभर सुरू असलेले अन्नत्याग उपोषण सायंकाळी ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांच्याहस्ते लिंबूपाणी पिऊन आंदोलनकर्त्यांनी मागे घेतले.