Wed, May 22, 2019 15:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्‍न समारंभातून सव्वा दोन लाखांचा आहेर लंपास

लग्‍न समारंभातून सव्वा दोन लाखांचा आहेर लंपास

Published On: Jan 09 2018 7:57PM | Last Updated: Jan 09 2018 7:57PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

लग्न समारंभातील गर्दीचा फायदा घेऊन स्वागत समारंभादरम्यान भेट आलेल्‍या सोन्या-चांदीच्या भेटवस्तू व रोकडीवर डल्‍ला मारणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. सद्दाम अबरार खान (वय 19) असे त्‍याचे नाव असून, त्‍याने  सव्वा दोन लाखांच्या मुद्देमालावर हात मारला. या प्रकारामुळे वऱ्हाडी मंडळींमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. 

कल्याण पश्चिमेकडील आग्रा रोडला रामजी निवास येथे राहणारे विनोद प्रजापती यांचा मुलगा मोहित याच्या लग्नाचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम 3 डिसेंबर रोजी सायंकाळी आधारवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला होता. दोन्ही कडच्या वऱ्हाडी मंडळींची लगबग सुरू होती. आलेल्या पाहुण्यांसह सर्वजण घाई-गडबडीत होते. पाहुणे मंडळींनी दिलेल्या आहेरांचा वर-वधू स्विकार करून हे सर्व आहेर शेजारी बसलेल्या करवला-करवलीकडे जमा करत होते. स्टेजवर मोठी गर्दी जमली होती. याच दरम्यान झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्या पावलांनी स्टेजवर आलेल्या तरूणाने प्रजापती यांचा मुलगा मोहित याला भेटवस्तू म्हणून दिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू, दागिने व रोकड असा मिळून सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. रात्री उशिराने प्रजापती यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळी या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला. या गुन्ह्याचा स्थानिक पातळीवर पोलिस तपास करत असतानाच क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटचे सिनीअर इन्स्पेक्टर संजू जॉन यांना खबरीमार्फत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कन्हेरी गावातल्या सदम नगर परिसरात सापळा रचला. तेथे असलेल्या एका पान टपरीवर सद्दाम खान संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान या चोरट्याने  बॅग लांबविल्याची कबूली दिली. सद्दाम खान हा सराईत चोरटा असून, क्राईम ब्रँचने त्याला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे यांनी सांगितले.