Tue, Sep 17, 2019 22:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  वृक्षांचा जाहिरातीसाठी वापर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

 वृक्षांचा जाहिरातीसाठी वापर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Published On: Jan 04 2018 7:36PM | Last Updated: Jan 04 2018 7:36PM

बुकमार्क करा
डोंबिवली : वार्ताहर

एकीकडे जागतिक तापमान वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील झाडांवर चक्क खिळे ठोकून त्यावर जाहिराती लावण्यात येत आहेत. अनेक वृक्षांवर लावण्यात आलेल्या जाहिरातींचा प्रकार एका दक्ष नागरिकाने उघडकीस आणला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांविरोधात पर्यावरणाला हानी पोहोचविल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. या संदर्भात प्रविण आंब्रे यांनी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे मुख्य उद्यान अधिक्षक यांच्यासह शासनाच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

महापालिका क्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, आंबिवली व टिटवाळा शहरातील मुख्य व शहरांतर्गत रस्त्यांवरील झाडांवर विविध प्रकारच्या जाहिराती खाजगी व शासकीय कार्यालयांमार्फत लावल्याचे दिसून येत आहे. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोड, आग्रा रोड, मुरबाड रोड, शहाड-मोहोने रोड येथील झाडांवरही जाहिरातीं लावण्यात आल्‍या आहेत. अद्याप या जाहिराती तशाच आहेत. शहरातील अन्य भागातील रस्त्यांवर देखील अशाचप्रकारे जाहिराती लावण्यात आल्याचे दिसते. झाडे ही सजीव असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशाप्रकारे झाडांना इजा पोहोचविणाऱ्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई आपल्या कार्यालयामार्फत होणे अपेक्षित असून त्याबाबत आपल्या कार्यालयाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आंब्रे यांनी या पत्रातून केली आहे. झाडांवर जाहिराती लावण्यास परवानगी देता येऊ शकत नसल्याने त्या विनापरवाना लावल्या जात असल्याचे स्पष्ट आहे. तरी त्यानुसार देखील योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.

विशेष गंभीर बाब म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकारी विभागामार्फत झाडे तोडण्यास परवानगी देण्याची कार्यवाही करताना हरकती मागविण्यासंदर्भातील नोटीसा सबंधित झाडांवर खिळ्यांनी ठोकून झाडांना इजा पोहोचविली जात असल्याचा गंभीर प्रकार दृष्टीस पडत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये देसाई खाडी ते दुर्गाडी चौक दरम्यान नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून त्यात बाधित होणारी 1 हजार 40 झाडे तोडण्याबाबत वृक्ष अधिकाऱ्यांच्या सहीच्या हरकती मागविणाऱ्या नोटीसा खिळे ठोकून पत्रीपूल, आग्रा रोड येथील झाडांवर लावण्यात आल्या आहेत. या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर देखील याप्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यात यावी. वस्तुत: वृक्ष प्राधिकरण विभागाकडून अशा नोटीसा झाडांवर चिटकविणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यावरून स्पष्ट होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वीच अण्णा हजारे यांच्या सूचनेनुसार 5 सप्टेंबर 2008 रोजी एक परिपत्रक काढून रस्त्याच्या कडेला झाडांना लावण्यात येणारे रिफ्लेक्टर खिळे ठोकून लावण्यास प्रतिबंध केला आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्त्यांची पाहणी करून झाडांचा जाहिरातीसाठी वापर करून त्यांना इजा पोहोचवून पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात पर्यावरण संरक्षण कायदा, झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, शहर विद्रुपीकरण विरोधी कायदा यातील नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी आंब्रे यांनी केली आहे.