Wed, Jul 17, 2019 08:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत वृक्ष संवर्धनाला तिलांजली

डोंबिवलीत वृक्ष संवर्धनाला तिलांजली

Published On: Jul 19 2018 4:11PM | Last Updated: Jul 19 2018 4:11PMडोंबिवली : वार्ताहर

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत सर्वत्र वृक्ष लागवड करण्यात येत आहे. शासनाच्या योजनेनुसार एक व्यक्ती, एक वृक्ष ही संकल्पना राबविण्यात येत असते. वृक्ष लागवडीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र डोंबिवली सारख्या सुज्ञानांच्या नगरीत वृक्षांची खांडोळी होऊ लागल्याने वृक्ष लागवडीच्या योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धडधाकट वृक्षांच्या खांडोळीच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागल्या आहेत.

यासंदर्भात दत्तनगर प्रभागातील मनसेचे शाखाध्यक्ष समीर भोर यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे एका तातडीच्या निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. या प्रभागातील विठ्ठल मंदिराजवळ असलेल्या वैदेही सोसायटी समोरील एक नारळाचे झाड मुळासकट छाटण्यात आलेले आहे. तसेच राहिलेली झाडेही रस्त्याला कुठेही अडथळा नसताना तोडण्याचे काम उद्यान विभागाच्या आदेशानुसार चालू आहे. सदर झाडे बेलाची आहेत. ही झाडे रस्त्याच्या कामाला अडथळा होत असेल तर मुळासकट काढून दुसऱ्या ठिकाणी लावण्यात यावीत, जेणेकरून वृक्ष संवर्धन आणि संरक्षण या दोन्हीचा मध्य साधता येईल व आपण झाडांचे प्राण वाचवू, असे शाखाध्यक्ष समीर भोर यांनी केडीएमसीच्या उद्यान अधीक्षकांना दिलेल्या तक्रार वजा निवेदनात म्हटले आहे. तसेच सदर झाडांना मुळासकट काढून टाकण्याचे कोणतेही साधन प्रशासनाकडे उपलब्ध नसेल तर तेवढा भाग सोडून काँक्रीटीकरण करण्यात यावे. मात्र जिवंत झाडे तोडण्यात येऊ नये. आमचा विकास कामांना विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होत असेल तर त्याला आमचा विरोध राहणार आहे. सदर रस्ता हा कोणत्याही प्रकारे अवजड वाहतूकीसाठी नाही. मर्यादीत गाड्याच या रस्तावरून ये-जा करीत असतात. त्यामुळेच अस्तित्वात असलेली झाडे न तोडता त्याचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मात्र धडधाकट वृक्षांची सरसकट कत्तल केल्यास नाईलाजाने पोलिस आणि सामाजिक वनीकरण तथा वन खात्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा शाखाध्यक्ष भोर यांनी दिला आहे.