Thu, Apr 18, 2019 16:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत रिपाईंच्या जिल्हाध्यक्षांना महिला कार्यकर्त्या भिडल्या

डोंबिवलीत रिपाईंच्या जिल्हाध्यक्षांना महिला कार्यकर्त्या भिडल्या

Published On: Mar 09 2018 4:47PM | Last Updated: Mar 09 2018 4:47PMडोंबिवली : वार्ताहर

रिपाईं (आठवले गट) च्या जिल्हाध्यक्ष पदावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना डोंबिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घडली. एका गटाची पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक आलेल्या जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांना संतप्त महिला कार्यकर्त्या भिडल्या. यावेळी झालेल्या झटापटीदरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याने कार्यकर्त्यांनी संतापून जाधव यांना मारहाणही केली. तर जाधव यांनीही कार्यकर्त्यांसह महिलांना मारहाण केल्याने या घटनेने रिपाईंमध्ये खळबळ माजली आहे.

कल्याण-डोंबिवली रिपाईंच्या झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उघडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे १६ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनास जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियोजनासाठी बैठक आयोजित केली होती. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत रिपाईंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडे यांनीही नाराजी व्यक्त करीत प्रल्हाद जाधव हटाव अशी मागणी केली. या मागणीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत जिल्हाध्यक्ष हटाव मागणीला जोर दिला. रिपाईं पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष बदला अशी मागणी आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये काही दिवसांपासून सुरू आहे. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी भीमा कोरेगांव प्रकरणात ज्याप्रमाणे भूमिका घेऊन आंदोलन उभे करावयास हवे होते तसे केले नाही. त्यांच्या कामाची पध्दत येथील रिपाईं पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना रूचत नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष हटाव ही भूमिका महिला पदाधिकाऱ्यांनीही लावून धरली. प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडे, माजी नगरसेवक भीमराव डोळस, महिला आघाडी मीना साळवे, डोंबिवली कार्याध्यक्ष जिजाभाऊ गोंडगे, संतोष जाधव, वैशाली सावर्डेकर उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर सभागृहात सुरू असलेल्या बैठकीचे वृत्त जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांना कळताच त्यांनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धाव घेतली. बैठकीबाबत विचारणा करताना त्यांनी माणिकराव उघडे यांना कार्यक्रमाबाबत विचारणा केली. परंतु जाधव यांच्या येण्यामुळे वातावरण तापल्याने बाचाबाचीनंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारी सोडवण्यासाठी महिला आणि कार्येकर्ते मधे पडले. यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव यांनी महिलांना धक्काबुक्की करत मारहाणही केली. यामध्ये शहराध्यक्षा वैशाली सावर्डेकर जखमी झाल्या. त्यामुळे इतर कार्यकर्ते चिडले या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जिल्हाध्यक्ष जाधव यांच्यावर हल्ला केला. या हाणामारीमध्ये वैशाली सावर्डेकर यांना जाधव यांनी मारहाण झाल्याचे समोर आले. त्यांच्या नाकाला दुखापत झाली. यामध्ये माणिक उघडे यांनाही मार बसला. तर झटापटीदरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या दरम्यान प्रल्हाद जाधव यांना प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये कोंडून ठेवल्याने त्यांची महिलांच्या तावडीतून सुटका झाली. या घटनेची माहिती कळताच रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयसिंग पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रल्हाद जाधव, माणिकराव उघडे तसेच इतर आरपीआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

याबाबत प्रल्हाद जाधव यांनी सांगितले की, पक्षाच्या नियमानुसार जर शहरात बैठक घ्यायची असेल तर शहराध्यक्षांची परवानगी असणे गरजेचे आहे. परंतु तसे काही न करता अशी बैठक का घेण्यात आली. याबाबत विचारणा करण्याकरता आलो होतो. पण पदाधिकाऱ्यांनी भान ठेवले नाही. त्यामुळे असा प्रकार घडला. मात्र मारामारी झाल्याच्या त्यांनी इन्कार केला. तर घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी चोकशी करत असल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.