Thu, Mar 21, 2019 15:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वेणी अन् न घातल्‍याने विद्‍यार्थिनीला शिक्षा

वेणी अन् न घातल्‍याने विद्‍यार्थिनीला शिक्षा

Published On: Mar 21 2018 7:55PM | Last Updated: Mar 21 2018 8:00PMडोंबिवली : वार्ताहर

केसांच्या दोन वेण्या घातल्या नाहीत. तसेच पायात कॅनव्हासचे शुज न घालता चप्पल घातल्याने एका विद्यार्थिनीला मुख्याध्यापिकेने बांबूच्या काठीने मारहाण केली आहे. ही संतापजनक घटना कल्याणमधील कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूलमध्ये घडली आहे. या प्रकरणी सदर विद्यार्थिनीने बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यपिका मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे राहणारी भक्ती म्हात्रे ही विद्यार्थीनी आपल्या कुटुंबियांसोबत राहते. भक्ती ही कल्याण पश्चिमेतील कॅप्टन आर. एम. ओक हायस्कुलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे भक्ती शाळेत गेली होती. मधल्या सुट्टीनंतर गणित या विषयाचा तास सुरू होता. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी या वर्गात पाहणी करण्यासाठी आल्या. यावेळी कुलकर्णी यांना भक्तीने केसांच्या दोन वेणी तसेच पायात कॅनव्हाज शुज न घालता चप्पल घातल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कुलकर्णी यांनी भक्तीला वर्गातील ब्लॅकबोर्ड समोर बोलावून घेतले. भक्ती ब्लॅकबोर्डजवळ जाऊन उभी राहिली असता त्यांनी तिला हात पुढे करण्यास सांगत बांबूच्या काठीने दोन्ही हातावर मारहाण केली. याचवेळी त्यांनी इतर विद्यार्थ्यांनाही मारहाण केली. या मारहाणीमुळे भक्तीच्या हाताला दुखापात झाली असून तिने या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कुलकर्णी या नेहमीच पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मारहाण करित असल्याचे तिने या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात बाल न्याय (मुलांचे काळजी आणि संरक्षण) अधिनियम 2000 चे कलम 23 प्रमाणे गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Tags : dombivali, principal, beating,student, uniform, issue