Fri, Apr 26, 2019 15:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  डोंबिवली : बिल्डरची भिंत पाडून रस्ता केला मोकळा

 डोंबिवली : बिल्डरची भिंत पाडून रस्ता केला मोकळा

Published On: Apr 06 2018 4:29PM | Last Updated: Apr 06 2018 4:29PMडोंबिवली : वार्ताहर

गेल्या 34 वर्षांपासुन स्थानिक स्वराज्य संस्था कडोंमपा, ग्रामपंचायत, आमदार निधी वापरून मानपाडा उसरघर हा रस्ता बनवला जात आहे. असे  असताना या सार्वजनिक वहिवाट असलेल्या अस्तित्वातील मुख्य रस्त्याला मधोमध खोल खोदून संरक्षक भिंत टाकण्याचे काम रूणवाल बिल्डरकडून करण्यात येत आहे. या प्रकाराला स्थानिकांनी विरोध केला. मानपाडा-संदप-उसरघर या रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या पीडितांनी अखेर बिल्डरने उभारलेली संरक्षक भिंत पाडून रस्ता मोकळा केला.

ठाणे पोलीस आयुक्तांपासून संबंधीत पोलीस ठाण्यात चौकशीचे पत्र उसरघर ग्रामस्थ व सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेने देऊनही उचित चौकशी केली जात नव्हती. शेवटी मागील दोन दिवसांपासून संबंधीत बांधकामाचे नियोजन प्राधिकरण असलेल्या एमएमआरडडीए, ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठीकाणी येऊन पाहणी केली असता, सदरचे खोदकाम हे विनापरवानगी असल्याचे तोंडी तसेच लिखीत स्वरूपात स्पष्ट केले. मात्र तरीही या बिल्डरने मानपाडा-संदप-उसरघर रस्त्याचे खोदकाम करून या रस्त्याच्या मधोमध संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरूचं ठेवले होते. हे कळताच शुक्रवारी या परिसरातील उसरघर, संदप, बेतवडे, आगासन, म्हातार्डी, दातिवली, दिवा भागातील शेकडो ग्रामस्थांसह सर्व पक्षीय युवा मोर्चा संघटनेचे प्रमुख संघटक गजानन पाटील, प्रेमनाथ पाटील, सुभाष पाटील, महेश संते, महादेव संते, सदानंद संते, गणेश पाटील, दत्ता म्हात्रे, प्रकाश पाटील, निवृत्ती पाटील, दिपक पाटील तसेच सामाजीक कार्यकर्ते संतोष केणे, गणेश म्हात्रे, नगरसेवक गजानन पाटील, रोहिदास मुंडे आदिंच्या सहकार्याने आणि लोकशाही मार्गाने निषेध आंदोलन करून बिल्डरने खोदलेला रस्ता बूजवून नागरीकांसाठी पुन्हा खूला केला. या आंदोलनात शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मानपाडा तसेच मुंब्रा पोलीस प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.