Tue, Apr 23, 2019 02:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निष्‍क्रिय वाहतूक नियंत्रण विरोधात डोंबिवलीकरांचे आंदोलन

निष्‍क्रिय वाहतूक नियंत्रण विरोधात डोंबिवलीकरांचे आंदोलन

Published On: Apr 18 2018 4:06PM | Last Updated: Apr 18 2018 4:06PMडोंबिवली : वार्ताहर

शहरातील पूर्व-पश्चिम विभागात वाहतूक कोंडीने आता स्वतःला सुशिक्षित म्हणविणाऱ्या डोंबिवलीकरांना बाहेर पडायचाच वीट आला आहे. वाहतूक नियंत्रण पोलीस आणि उप-प्रादेशिक परिवहन प्रशासकीय कारभाराच्या निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले जात आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या विषयात सक्रीय सहभाग घेवून अनेक पर्याय सुचविले आहेत. तथापी काहीच फरक पडत नसल्याने मंगळवारी संध्याकाळी लालबावटा रिक्षा युनियन आणि प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाले मंच यांनी संयुक्तरित्या शहरातील निष्क्रिय कारभार आणि बेशिस्त वाहतूक विरोधात आंदोलन छेडले. परंतु शहर पोलिसांनी परवानगी घेतली नसल्याचे कारण देत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

मंगळवारी संध्याकाळी पूर्वेकडील रामनगर वाहतूक पोलीस चौकी आणि रेल्वे तिकीट खिडकी परिसर येथे नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी होवून नागरिक त्रस्त होत होते. अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाचा शिडकावने मुंबईहून आलेल्या चाकरमन्याचे हाल झाले. दरम्यान लालबावटा रिक्षा युनियन आणि प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाले मंच यांच्या संयुक्त आंदोलनाच्या एकत्रित शिटीच्या आवाजाने दोन चाकी, रिक्षा आणि चार चाकी वाहनाची त्रेधा तिरपिट झाली. प्रवाश्यांना नक्की कोणाच्या शिट्यांचा मोठा आवाज होतोय समजून आले नाही. अचानक “बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावा, आपण यांना (आर.टी.ओ.) पाहिलेत का ? अशा घोषणानी रामनगर विभाग दणाणून गेला.

या अनोख्या आंदोलनाबाबत सहभागी लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर म्हणाले, वाहतूक पोलीस वाहतुकीला शिस्त लावत नाहीत. वाहतूक पोलीस हप्ते खाण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे शहराची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. म्हणून वाहतूक पोलिसांचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी वाहतूक नियंत्रण आंदोलन सुरू केले आहे. आम्ही स्वतः जनतेला आवाहन करून वाहतूक नियंत्रण करण्याचं काम करीत आहोत. आजपासून शहरात 3 ते 9 ज्या-ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी वाहतूक पोलीसांचा निषेध म्हणून वाहतूक नियंत्रणाचे काम करणार आहोत. वाहतूक पोलीस संख्या 25 आणि त्यांचे सहकारी 15 असा चाळीस अशी संख्या असूनही वाहतूक नियंत्रण होत नाही याची खंत वाटते. तर नियमाप्रमाणे कारवाई करावी. नो पार्किंग, नो इंट्री मध्ये गाड्या पार्क केल्या जातात त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शिस्त लागण्यासाठी जे नियम आहेत त्यांचा काटेकोरपाने पालन केले पाहिजे असे प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑटोवाले मंचचे सचिन दळवी यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी पावसाच्या शिडकाव्यातही वाहतूक नियंत्रणाचे काम केले परंतु त्यांच्या घोषणाबाजी आणि वाहतूक पोलीस विरोधी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नसल्याचे करण देत आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनाच्या वेळी वाहतूक पोलीस न दिसल्याने उपस्थित प्रवाशांनी आंदोलनकर्त्यांना त्यांच्या आंदोलनास पाठींबा दिला.