Mon, Aug 19, 2019 06:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला स्वच्छतागृहांच्या कमतरतेचा कल्याणात बळी

महिला स्वच्छतागृहांच्या कमतरतेचा कल्याणात बळी

Published On: Dec 26 2017 8:03PM | Last Updated: Dec 27 2017 1:31AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

लघुशंकेसाठी रेल्वे रुळावर उतरलेल्या महिलेचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकात घडली. केवळ प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृहांची कमतरता असल्याच्या कारणामुळे ही घटना घडली. यानंतर या घटनेला रेल्वे प्रशासनाची उदासीनता जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

सीताबाई सोळंके असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून त्या मूळच्या परभणीच्या राहणाऱ्या होत्या. मुलीच्या उपचारासाठी त्या नातेवाईकांसोबत देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला आल्या होत्या. कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर गाडी थांबल्यानंतर त्या लघुशंकेला जाण्यासाठी डब्यातल्या प्रसाधनगगृहाजवळ आल्या. मात्र तिथे गर्दी असल्याने त्या खाली उतरल्या आणि थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 4 च्या रेल्वे रुळात लघुशंकेसाठी उतरल्या. मात्र याचवेळी 6 वाजून 23 मिनिटांची बदलापूर लोकल कल्याण स्थानकात प्रवेश करत होती. या लोकलने त्यांना धडक दिली. त्या लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये अडकून बसल्या. जवळपास तासभर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मृतदेहच हाती लागला. या घटनेमुळे रेल्वेचा तासभर खोळंबा झाल्यामुळे रेल्वेने लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या उद्घोषणा सर्व स्टेशन्सवर सुरू केल्या. मात्र नंतर अपघातामुळे हा खोळंबा झाल्याचे समोर आले आणि रेल्वेचं बिंग फुटले. रेल्वेने अशा खोट्या उद्घोषणा का केल्या ? याचे कारण शोधण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात गेल्यानंतर तेथे समोरच्या बाजूला महिलांसाठी प्रसाधनगृहच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे प्रथमदर्शनी जरी चूक सीताबाई सोळंके यांची वाटत असली, तरी या अपघाताला आणि त्यानंतर झालेल्या रेल्वेच्या खोळंब्याला रेल्वे प्रशासनाची उदासीनताच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन ही चूक सुधारण्याकडे लक्ष देते का ? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात कल्याणच्या रेल्वे प्रशासनातील एकही अधिकाऱ्याने यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविला. त्यामुळे रेल्वेची बाजू समजू शकली नाही.