Mon, May 27, 2019 00:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

डोंबिवली : अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

दुकानात सामान आणण्यास गेलेल्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका दुकानदाराने विनयभंग केला. इतकेच नव्हे तर घडल्या प्रकाराचा जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या आईलाही दुकानदार आणि त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. पोलिसांनी भरत मांगीलाल कुमावत (वय 37) या फुटवेअर दुकानदाराला बेड्या ठोकून गजाआड केले आहे.

पीडित मुलगी डोंबिवली पूर्वेकडील उंबार्ली गावात राहते. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही मुलगी धागा आणण्यासाठी भरत कुमावत याच्या दुकानात गेली होती. मात्र भरत याने दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने भयभीत झालेल्या मुलीने ही बाब आईला संगितली.  मुलीच्याआईने थेट कुमावत याला आपल्या मुलीच्या बाबतीत घडल्या प्रकाराबाबत जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या कुमावत आणि त्याच्या पत्नीने पीडित मुलीच्या आई व वडिलांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणी सदर मुलीच्या आईने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी भरत कुमावतसह त्याची पत्नी रेखा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी भरतला अटक केली.