Tue, Mar 26, 2019 07:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पिंडीवरील दूध भटके आणि अनाथांच्या मुखात 

पिंडीवरील दूध भटके आणि अनाथांच्या मुखात 

Published On: Feb 13 2018 6:10PM | Last Updated: Feb 13 2018 6:10PM डोंबिवली :बजरंग वाळुंज

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली व आसपासच्या परिसरातील खिडकाळेश्वर, मानपाडेश्वर आणि श्री क्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरात सोमवारी रात्रीपासूनच शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. कल्याण-डोंबिवली परिसरातील लाखो भाविक या तीन मंदिरांमध्ये दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी पोलिसांचासुद्धा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्‍यान प्राणीमात्रांसाठी कार्य करणाऱ्या पॉज संस्थेने डोंबिवली आणि आसपासच्या शिवमंदिरात पिंडीवर वाहण्यात येणारे दूध गोळा करून भटके प्राणी व अनाथांना वाटले. 

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या खिडकाळी पंचक्रोशीत पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील शिवमंदिर म्हूणन खिडकाळेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक कल्याण, डोंबिवली, नवी मुबंई, ठाणे परिसरातून दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे या मंदिरातील शिवपिंडीवर होणारा दुधाचा अभिषेक गेल्या 6 वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. दुधाचा अभिषेक न करता हे दूध गरिबांमध्ये वाटप करा, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. मंदिराकडून करण्यात आलेल्या या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खिंडकाळी मंदिरात विशेष आकर्षण ठरली ती अनोखी रांगोळी. या रांगोळीत तांदूळ, तूप, कोळसा आणि विविध दगडांचा वापर करून ही रांगोळी साकारण्यात आली होती. मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच मोठी रांग लागली होती. या  ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्‍त जत्रासुद्धा भरली आहे. त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. याचे सर्व नियोजन खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्ट आणि गावदेवी चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. स्थानिक ग्रामस्थ वासुदेव पाटील, गौतम पाटील, बाळकृष्ण पाटील, पंढरीनाथ पाटील आणि सुमारे 200 स्वयंसेवक यासाठी कार्यरत आहेत.

डोंबिवलीजवळच्या कल्याण-शिळ मार्गावरील मानपाडा गावातील मानपाडेश्वर मंदिरात मंगळवारी सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या मंदिरात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम दिवसभर सुरू होते. बुधवारी याठिकानी  महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मंदिराचे सर्व नियोजन गुलाब वझे, पांडुरंग म्हात्रे, सदाशिव भोईर आणि वझे परिवार यांच्याकडून केले जाते. 

डोंबिवलीत आणखी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे. पिंपळेश्वर मंदिरात शंकराची रांगोळी, सेल्फी पॉईंट आणि चार वेद हे मुख्य आकर्षण आहे. रांगोळी आणि चार वेदांची पुस्तके पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पॉज संस्थेचे अनोखे कार्य :

 डोंबिवलीमध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांकडून तब्बल 150 लीटर दूध जमा केले. जमलेले दूध डोंबिवलीमधील काही संस्थाना व प्राण्यांना देण्यात येणार असल्‍याचे पॉज संस्थेकडून सांगण्यात आले. सुसंस्कृत व सांस्कृतिक डोंबिवली शहरात पॉज प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेच्यावतीने महाशिवरात्रीत जे शिवभक्त शंकराच्या पिंडीवर दूध ओतून दर्शन घेतात ते दुध वाया जाऊ नये याकरिता या संस्थेमार्फत गेल्‍या तीन वर्षांपासून डोंबिवलीत पूर्व व पश्चिम येथील शिव मंदिरात जाऊन दूध जमा केले जात आहे. हे दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, जननी अनाथालय येथील बालकांना आणि रस्त्यावरील भटकी कुत्री, मांजरे याना दूध व फळे दिली जातात. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांच्या टीमने गेल्‍या 3 वर्षांपासून सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भणगे यांनी सांगितले.