Wed, Apr 24, 2019 12:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिबट्या-वाघाच्या कातड्यांसह दोघा तस्करांना अटक

बिबट्या-वाघाच्या कातड्यांसह दोघा तस्करांना अटक

Published On: Apr 20 2018 4:59PM | Last Updated: Apr 20 2018 4:59PMडोंबिवली : वार्ताहर

देशभरात वाघ वाचवा मोहीम जोरात असतानाच गेल्या बारा वर्षांत सुमारे साडेचारशे वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावल्याची माहिती पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली असतानाच, लाखो रूपये किंमतीच्या वाघाची व बिबट्याच्या कातड्याच्या विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटने बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगाव परिसरात लावलेल्या सापळ्यात हे तस्कर क्राईम ब्रँचच्या सापळ्यात अडकल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.

विलास लक्ष्मण धनराज (वय 30) आणि सचिन जनार्दन म्हात्रे (33) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. दोघेही आरोपी रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील चौक गावचे राहणारे आहेत. या दुकलीकडून क्राईम ब्रँचने लाखो रूपये किंमतीची पट्टेरी वाघ व बिबट्याची कातडी जप्त केली आहेत. बदलापूर पाईपलाईन कोळेगाव येथील समाधान हॉटेल नजीक दोघे इसम बिबट्या आणि वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खबर कल्याण युनिटला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे, जमादार ज्योतीराम सांळुखे, दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, राजेंद्र घोलप, हरिश्चंद्र बंगारा, राजेंद्र खिलारे, प्रकाश पाटील, अजित राजपूत, सुरेश निकुळे, सतीश पगारे, विश्वास चव्हाण, अरविंद पवार या पथकाने सदर ठिकाणी गुरूवारी सायंकाळी सापळा रचला होता. यावेळी दोन इसम एका रिक्षातून प्लास्टिकच्या पिशवीसह उतरले. संशयास्पद हालचालींमुळे खात्री पटताच क्राईम ब्रँचने पळून जाण्याचा तयारीत असलेल्या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीतून दोन कातडी आढळून आली. त्यापौकी एक बिबट्याचे कातडे असून त्याची लांबी साडे सहा फुट, तर वाघाच्या कातडी सारखे दिसणारे साडे तीन फुटाचे कातडे त्यात आढळून आले. पोलिसांनी विलास धनराज आणि सचिन म्हात्रे  या दोघांना ताब्यात घेऊन त्यांचीही झडती घेतली. या प्रकरणी हवालदार दत्ताराम भोसले यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी या तस्करांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48 (ए), 49, 51 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

काळ्या बाजारात बिबट्याच्या कातड्याला 5 ते 10 लाख, तर पट्टेरी वाघाच्या कातडीला जवळपास 25 ते 30 लाख रूपये मोजले जातात. या दुकलीने ही कातडी कोठून आणली. या कातड्यांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात येणार होता का. यापूर्वी असे व्यवहार झाले आहेत का. यामागे तस्करांची मोठी टोळी आहे का. या दुकलीने ही दोन कातडी नेमकी कोठून व कशासाठी व कुणाला विकण्यासाठी आणली, या सगळ्याची पोलखोल करण्यासाठी न्यायालयाकडे सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, यासाठी अर्ज केल्याचे वपोनि संजू जॉन यांनी सांगितले. कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दुकलीला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वाघांच्या शिकाऱ्यांवरून वन खात्याचे उडाले लक्ष : 

महाराष्ट्रातील वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे असे म्हटले जात असले तरी वास्तवात वाघांची संख्या घटत नसून वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 303 वाघ असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. यापैकी 203 वाघ असून 100 बछडे आहेत. एकीकडे राज्यात वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, आणि दुसरीकडे शिकारी आणि तस्कर वाघांच्या मुळावर उठले आहेत. महाराष्ट्रात 37 अभयारण्ये आहेत. महाराष्ट्रासह भारतातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यासाठी सुमारे 60 हजार चौ. कि. मी. चे जंगल राखीव करण्यात आले आहे. एकीकडे वाघांच्या शिकारीला चाप लावण्यासाठी शिकारी दिसताक्षणीच त्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले असून, हा गोळीबार गुन्हा समजला जाणार नाही, असे महाराष्ट्र सरकारने घोषीत केले आहे. तर दुसरीकडे क्राईम ब्रँचने हस्तगत केलेल्या कातड्यांच्या वाघांची शिकार कुणी आणि कशा पद्धतीने केली याचा उलगडा लवकरच न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून येणाऱ्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.