होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  केडीएमसी कामगारांचे सभापतीच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन   

 केडीएमसी कामगारांचे सभापतीच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन   

Published On: Mar 01 2018 6:39PM | Last Updated: Mar 01 2018 6:39PM



डोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांचे वेतन दोन महिन्यांपासून थकविले आहे. त्‍यामुळे होळीचा सण कामगारांच्या कुटुंबियांनी कसा साजरा करायचा असा संतप्त सवाल उपस्थित करून होळी सणाच्या दिवशीच कामगारांनी परिवहन सभापती संजय पावशे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव यांनी परिवहन सभापतीच्या दालनासमोर आज दुपारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. होळीची सुट्टी नसल्याने महापालिकेचे कामकाज आज सुरू होते. परिवहन सभापती पावशे हे दालनात येण्यापूर्वीच त्यांच्या दालनाबाहेर कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. सरचिटणीस जाधव यांनी सांगितले की, कामगारांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. आज होळीसारखा मोठा सण पण कामगांराच्या हातात पैसा नसल्याने त्याच्या घरात पुरणाची पोळी कशी बनेल असा प्रश्न उपस्थित केला.

कामगार दररोज परिवहनला साडे पाच लाखाचे उत्पन्न  मिळवून देतात. कामगारांनी आज त्यांचे कर्तव्य बजाविल्यानंतर हे आंदोलन सुरू केले आहे. कामगारांना पगार मिळत नाही. तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे इशारा जाधव यांनी दिला आहे. परिवहन उपक्रमाला महापालिकेकडून सापत्न वागणूक दिली जाते. मूलभूत सोयी सुविधा कामगारांना उपलब्ध करून दिल्या जात नाही. परिवहनमध्ये जवळपास 550  कामगार कार्यरत आहे. 1999 सालापासून कामगारांची थकीत देणी दिलेली नाहीत.
दरम्यान 14 वर्षापासून कंत्राटी कामगार सात ते आठ हजार रुपये पगारावर काम करीत आहेत. अन्य परिवहन उपक्रमात चालक वाहकाला किमान २०  हजार रूपये पगार मिळतो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कमी पगारावर कामगारांना राबवून घेतले जाते. कमी वेतनही वेळेवर दिले जात नाही.  यापुढे थकीत वेतन आणि कर्मचा-याच्या मागील फरकाची रक्कम ४  मार्चच्या आत मिळाली नाही तर, परिवहन कामगार बेमुदत चक्का जाम आंदोलन 5  मार्च पासून करतील असा इशारा परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.