Mon, Aug 19, 2019 13:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसी प्रशासनाचा अर्धनग्नावस्थेत निषेध

केडीएमसी प्रशासनाचा अर्धनग्नावस्थेत निषेध

Published On: Mar 22 2018 8:27PM | Last Updated: Mar 22 2018 8:27PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण-डोंबिवलीतील अवैध बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच  फेरीवाले आणि उन्मत्त भूमाफियांना रान मोकळे करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजपाच्या 11 नगरसेवकांनी बुधवारी चार तास डोंबिवलीच्या विभागीय कार्यालयात शड्डू ठोकून निषेध नोंदविला होता. ही घटना ताजी असतानाच अवैध मंदिर उभारणीच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने गुरूवारी दुपारी चक्क अंगावरील कपडे उतरवून प्रभागक्षेत्र कार्यालयात अर्धनग्नावस्थेत अनोखे आंदोलन केले.

अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या जैन मंदिराविरोधात आवाज उठविल्यामुळे 22 मार्च 2017 रोजी माहिती अधिकार कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर जीवघेण्या हल्ल्या करण्यात आला होता. यानंतरही पोलीस आणि महापालिका प्रशासनाने भूमाफियांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई केली नाही. एक वर्ष उलटूनही प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड झाल्याने गुरूवारी दुपारी सव्वातीन वाजता निंबाळकर यांनी फ प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडित यांच्या कार्यालयात घुसून अर्धनग्नावस्थेत धरणे आंदोलन सुरू केले. 

महेश निंबाळकर यांनी मानपाडा रोडला असलेल्या कस्तुरी प्लाझा येथील अनधिकृत जैन मंदिराबाबत गेली तीन वर्षे आवाज उठवत आहेत. महापालिका प्रशासनाकडे त्यांनी या विषयी पत्रव्यवहार करूनही काहीच ठोस उत्तर मिळाले नाही. उलट निंबाळकर यांना जबर मारहाण झाली. या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन हल्लेखोर आणि सूत्रधारांना पकडण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे एक वर्षानंतर अशा पद्धतीचे आंदोलन करत असल्याचे महेश निंबाळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, रामनगर पोलिस ठाणे, कस्तुरी प्लाझा येथील अनधिकृत जैन मंदिर आणि महापालिका कार्यालय आदी ठिकाणी प्रशासनाचा नाकर्तेपणा सिद्ध करण्यासाठी अर्धनग्नावस्थेत निषेध आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. याबाबत संबंधित प्रशासनास पत्रव्यवहारही केला. रामनगर पोलीस ठाण्याने परवानगी नाकारल्याचे पत्र दिले. परंतु पालिका प्रशासने माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. यामुळे मी प्रभागक्षेत्र कार्यालयात अशा पद्धतीने आंदोलन केले.

दरम्यान पालिका प्रशासनाच्या आवारात कोणीही घुसून काहीही करू शकते याचा पुरावा निंबाळकर यांच्या क्रियेने सिद्ध झाला आहे. सुरक्षारक्षक काय करीत होते, असे प्रश्न विचारले जात आहे. जबाबदार पालिका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून स्वतः निंबाळकर अर्धनग्न होतात हे कशाचे द्योतक आहे. पालिका कार्यालयात महिला वर्गासमोर एक पुरूष अर्धनग्न होतो आणि सुरक्षारक्षक बघ्याची भूमिका घेतात. या कृतीमुळे पालिकेचे धिंडवडे उडाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी महेश निंबाळकर यांचा भाऊ नंदकुमार, आई मालती, पत्नी धनश्री या घटनेचे साक्षीदार राहतात ही खेदजनक घटना आहे. डोंबिवली विभागीय कार्यलयात अशा विचित्र निषेध आंदोलनाची घटना होऊन दोन तास उलटूनही जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. मात्र साडेतीन तास अर्धनग्नावस्थेत बसलेल्या निंबाळकर यांनी दोन दिवसांत सदर अनधिकृत बांधकामांवर ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. दोन दिवसानंतर तोडकामाची कारवाई सुरू न केल्यास यापेक्षाही प्रखर आंदोलन करणार असल्याचे निंबाळकर यांनी जाहीर केले.

Tags : dombivali, kalyan dombivali, muncipal corporation, Illegal construction ,against, half nude, protest,