Thu, Jun 27, 2019 14:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारतीय सैंन्याने २ तासांत बनवला पादचारी पूल

भारतीय सैंन्याने २ तासांत बनवला पादचारी पूल

Published On: Jan 18 2018 7:16PM | Last Updated: Jan 18 2018 7:16PMडोंबिवली : वार्ताहर

आंबिवली येथील रेल्वेच्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम भारतीय सैन्याने अवघ्या 2 तासांत फत्ते करत आपल्या अफाट कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडवले. सकाळी 10 वाजता सुरू केलेले हे काम दुपारी 12 वाजण्यापूर्वीच पूर्ण करत भारतीय जवानांनी भारतमातेचा जयघोष केला.

एलफिस्टन रोड येथील पादचारी पुलावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांतील पादचारी पुलांची पाहणी केली होती. त्यातील आंबिवलीचा पूल अतिशय जीर्ण झाल्याचे आढळल्याने त्याच्या तातडीने पुनर्बांधणीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. हे काम युद्धपातळीवर होणे गरजेचे असल्याने, तसेच स्थानिक पातळीवर इराणी नागरिकांचा होणारा संभाव्य विरोध लक्षात घेऊन हे काम भारतीय सैन्याला देण्यात आले. त्यासाठी 1 नोव्हेंबरपासून 3 महिन्यांची मुदत भारतीय सैन्याला देण्यात आली होती. मात्र परवानग्या, अतिरिक्त भूसंपादन या सगळ्यामुळे सैन्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास 18 डिसेंबरचा दिवस उजाडला. मात्र त्यानंतरही प्रचंड वेगवान काम करत भारतीय सैन्याने मुदत संपण्यापूर्वीच अवघ्या एक महिन्यात हा पूल उभारला. भारतीय सैन्याच्या इंजिनियरिंग विभागाच्या 50 जवानांनी रात्रंदिवस काम करत आज या पुलाचा मुख्य गर्डर टाकला. यासाठी मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा मार्गावर 5 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. आता ठेकेदाराच्या माध्यमातून जिने, पत्रे अशी कामे करण्यात येणार असून ही सर्व कामे ३१ जानेवारीपूर्वी करण्याचे आव्हान सैन्यासमोर आहे.

 भारत-चीन सीमेवरून आणले साहित्य

भारतीय सैन्याने आंबिवली स्थानकात उभारलेला पूल हा ‘बेली’ प्रकारातला पूल आहे. हे पूल युद्धजन्य किंवा आपत्कालीन परिस्थितीत 24 तासांत उभारण्याची सैन्याची क्षमता आहे. आंबिवली स्थानकातही कालपासून या गर्डरच्या जोडणीला सुरुवात करून आज सकाळी गर्डर पिलर्सवर चढवण्यात आला. या पुलासाठी लागणारे साहित्य भारत-चीन सीमेवरील डोकलाम येथे असलेल्या भारतीय सैन्यतळावरून मागवण्यात आले. या पुलाचे आयुर्मान किमान ५० वर्ष असेल, असा दावा भारतीय सैन्याचे ब्रिगेडियर धीरज मोहन यांनी केला असून, या पुलावरून 40 टन वजनाचा अजस्त्र रणगाडा गेला, तरी पूल किंचितही हलणार नाही, असा सैन्याचा विश्वास आहे. सैन्याचा या कामगिरीचे प्रवाशांमधून मोठे कौतुक केले जात आहे.